दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या दुस-या सामन्यात भारताने मागच्या पराभवाचा वचपा काढला असून २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पाकिस्तानने भारताला पराभूत केले होते. त्यावेळी विराट कोहलीच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा होती. मात्र यावेळी विराट कोहलीने सावध खेळी करत पाकिस्तानला पराभूत करण्यात मोलाची भूमिका बजावत हिसाब बराबर करून टाकला.
पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय फसला असंच म्हणावे लागेल. कारण पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ४९.४ षटकात सर्व गडी गमवून २४१ धावा केल्या आणि विजयासाठी २४२ धावांचे आव्हान दिले. हे आव्हान भारताने सहज गाठलं. कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार शुबमन गिल याने आक्रमक सुरुवात करून दिली. त्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी डाव पुढे नेला. तिस-या विकेटसाठी चांगली भागीदारी केली. दोघांनी तिस-या विकेटसाठी १०० हून अधिक धावांची भागीदारी केली. विराट कोहलीने शतक ठोकत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. टीम इंडियाने सहा विकेट आणि ४५ चेंडू राखून विजय मिळवला.
साखळी फेरीच्या दुस-या सामन्यात भारताकडून पाकिस्तानचा पराभव होताच स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. पाकिस्तानला उपांत्य फेरीतील आव्हान कायम ठेवण्यासाठी या सामन्यात विजय महत्त्वाचा होता. पण विजय काही मिळवता आला नाही. त्यामुळे या स्पर्धेतील तिसरा सामना हा औपचारिक असणार आहे. या स्पर्धेतील शेवटचा सामना बांगलादेशशी होणार आहे. यामुळे पाकिस्तानला लाज राखण्यासाठी हा सामना जिंकणे भाग आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड गेल्या वर्षभरापासून या स्पर्धेसाठी तयारी करत होते. पण दोन सामन्यातच पीसीबीचे स्वप्न भंगले आहे. दुसरे भारताने उपांत्य फेरी गाठल्याने आणखी एक सामना दुबईत होणार आहे. भारताने अंतिम फेरी गाठली तर हा सामनादेखील दुबईत होणार आहे. एकंदरीत या सामन्यात पराभवामुळे पीसीबीचीही नाचक्की झाली आहे. आयसीसी स्पर्धेतून दोन सामन्यातच गाशा गुंडाळावा लागला आहे. शेवटचा सामना जिंकला आणि एखाद्या चमत्काराचा विचार जरी केली तर नेट रनरेट काही चांगली नाही. त्यामुळे तसे काहीच होणार नाही.