16.3 C
Latur
Tuesday, January 7, 2025
Homeनांदेडनांदेडातील बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींची निर्दोष सुटका

नांदेडातील बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींची निर्दोष सुटका

तब्बल १९ वर्षांनी निकाल सीबीआयला बसला धक्का

नांदेड : प्रतिनिधी
संपूर्ण देशभर गाजलेल्या नांदेड शहरातील पाटबंधारे नगर येथील बॉम्बस्फोट प्रकरणात नांदेड न्यायालयाने सर्व आरोपींची शनिवारी निर्दोष मुक्तता केली. या स्फोटात दोन आरोपींचा मृत्यू झाला होता. तर दहा जणांवर खटला सुरु होता. तब्बल १९ वषार्नंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे. या निकालामुळे सीबीआयला धक्का बसला आहे.

नांदेड शहरातील पाटबंधारे नगर भागात ६ एप्रिल २००६ रोजी लक्ष्मण राजकोंडवार यांच्या घरात मोठा स्फोट झाला होता. या स्फोटात नरेश राजकोंडवार आणि हिमांशू पानसे यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर मारोती वाघ, योगेश देशपांडे, गुरुराज तुप्तेवार व राहूल पांडे हे गंभीर जखमी झाले होते. तर मोठी इमारत असलेल्या घरात हा स्फोट झाल्याने घरातील साहित्य छिन्नविछिन्न झाले होते. गेल्या अनेक वर्षातील ही मोठी घटना असल्याने संपूर्ण देशभरात गाजली होती. सुरुवातीला हा स्फोट फटाक्यांचा असल्याचे मानले जात होते. परंतु दुस-या दिवशी घराची तपासणी घेतल्यानंतर हे गंभीर प्रकरण एटीएसकडे देण्यात आले.

यानंतर हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला. तपासा दरम्यान आरोपींचा संबंध पूर्णा, परभणी आणि जालना येथील बॉम्बस्फोटांशी असल्याचे पुढे आले. या प्रकरणात सीबीआयने २ हजार पानांची चार्जशीट तयार केली होती. त्यात बारा जणांना आरोपी करण्यात आले होते. जिल्हा व सत्र न्या. सी. व्ही. मराठे यांनी या खटल्यात ४९ साक्षीदार तपासले. त्यात सीबीआय पाटबंधारे नगर येथील त्या घरात बॉम्बस्फोट झाल्याचे सिद्धच करु शकली नाही. त्या ठिकाणी फटाक्यांचा स्फोट झाला होता हे ग्रा धरुन न्यायालयाने सर्व आरोपींची शनिवारी ४ रोजी निर्दोष मुक्तता केली. शनिवारी या प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात आला.

खटल्यात बचाव पक्षाच्या वतीने ऍड. नितीन रुणवाल यांनी बाजू मांडली. २००६ मध्ये झालेल्या या बॉम्बस्फोटाचा निकाल तब्बर १९ वर्षानंतर लागला. यात सीबीआयने २ हजार पानांची चार्जशीट तयार करून त्यात बारा जणांना आरोपी केले होते. परंतू या सर्वांची निर्दोष सुटका केल्याने देशातील उच्च तपास यंत्रणा असलेल्या सीबीआयला मोठा धक्का बसला आहे. हा निकाल ऐकण्यासाठी न्यायालयीन परिसरात लोकांनी गर्दी केली होती. तर निकालाच्या पार्श्वभूमिवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR