मुंबई : उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांच्या प्रचार रॅलीत मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी इब्राहिम मुसा सहभागी झाल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध करून भाजपने टीकेची झोड उठवली आहे. महाविकास आघाडीच्या लोकांनी राजकारणासाठी देशविरोधी लोकांशी हातमिळवणी केल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईत मतदान होणार असून प्रचार हळूहळू शिगेला जात आहे. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर व महायुतीकडून शिंदेंच्या शिवसेनेचे रवींद्र वायकर यांच्यात लढत होत आहे. अमोल किर्तीकर यांच्या प्रचार रॅलीत मुंबईत १९९३ सली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी १० वर्षांची शिक्षा भोगून आलेला इब्राहिम मुसा सहभागी झाल्याचा आरोप भाजपाने केला होतं. याचा एक व्हिडिओ ही प्रसारित करण्यात आला होता. बॉम्बस्फोटासाठी इब्राहिम मुसाने हत्यारे पुरवल्याचा आरोप होता. कोर्टाने त्याला दहा वर्षांची सुनावली होती.
यावरुन भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली. इंडिया आघाडी मतांच्या लांगुलचालना करता उज्ज्वल निकम यांचा विरोध करत कसाबचे महात्म्य गात आहे. दुसरीकडे बॉम्बब्लास्टचा आरोपी त्यांच्या प्रचारात दिसतोय त्यामुळे देशविरोधी लोकांशी ठाकरे गटाने, काँग्रेसने आणि शरद पवारांच्या पक्षाने हातमिळवणी केली आहे हे स्पष्ट दिसत आहे असा आरोप फडणवीस यांनी केला. तर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांची मशाल दहशतवाद्यांच्या हाती असल्याचा आरोप केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये असताना याकूबच्या कबरीचे सुशोभीकरण, टीपू सुलतान, औरंगजेबाचा उदो उदो झाला आणि आता थेट मुंबईकरांचा जीव घेणा-या आरोपीकडून उबाठा गटाचा प्रचार केला जात आहे. वंदनीय बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटत असेल? अशी टीका त्यांनी केली.
त्याला ओळखतही नाही : अमोल किर्तीकर
ठाकरे पक्षाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी आपण त्या व्यक्तीला ओळखतही नसल्याचे स्पष्टीकरण केले आहे. भाजपवाल्यांचं माझ्या प्रचारावर भरपूर लक्ष आहे. त्यामुळे आम्ही पुढे आहोत हे लक्षात येते. प्रचार सुरु अताना त्या रॅलीत कोण असतं, कोण नसतं, त्यांना आम्ही बोलावलं नसतं. त्या व्यक्तीला मी ओळखतही नाही असं अमोल किर्तीकर यांनी स्पष्ट केले. स्वत: इब्राहिम मुसा यांनेही याबाबत स्पष्टिकरण केले आहे. अमोल कीर्तीकर यांच्याशी माझी ओळख नाही. एका लग्नात मी त्यांना दोन मिनिटांसाठी भेटलो होतो. अमोल कीर्तिकर यांची रॅली जात होती त्या ठिकाणी मी बाजूला उभा होतो. मी त्या रॅलीत गेलो नव्हतोकिंवा मला कुणी बोलावलं नव्हतं. मी त्या रॅलीत असतो तर माझ्यासोबत आणखी काही लोक असते. मोसिन हैदर नावाचे नगरसेवक यांनी मला हाक मारल्यामुळे मी त्या ठिकाणी गेलो आणि त्यांना भेटलो. त्यानंतर मी निघून गेलो, असे त्याने स्पष्ट केले आहे. मात्र त्याच्या सहभागामुळे भाजपाला मुद्दा मिळाला आहे.