40.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात ड्रग्जचा सुळसुळाट

महाराष्ट्रात ड्रग्जचा सुळसुळाट

प्रकाश आंबेडकरांचा आरोप

मुंबई : नाशिक ते लोणावळा पट्टयात अनेक ठिकाणी अमली पदार्थांचा पुरवठा करणा-या ठिकाणांची माहिती असतानाही त्याच्यावर कारवाई केली जात नाही. तेथे कारवाई न करण्याबाबत केंद्रातील कोणत्या मंत्र्याने सूचना दिल्या आहेत का, असा सवाल करत उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला याची माहिती द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

१९९३ ला मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले. त्यासाठी ड्रग्सचा पैसा वापरण्यात आला होता. त्यातूनच शस्त्र आणि दारूगोळा मुंबईत आला व बॉम्बस्फोट करण्यात आले. ड्रग्जचा व्यवहार हा एक संघटित गुन्हा असून त्याचा दहशतवादाशी संबंधित आहे. या ड्रग्जमधून जो पैसा मिळतो तो दहशतवादी कारवायांसाठी वापरला जातो. २०२१ मध्ये मुंद्रा पोर्टवर एनआयएमार्फत अमली पदार्थांचा मोठा साठा पकडण्यात आला. एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रात ड्रग्सचा पैसा लष्कर-ए-तोयब्बा या दहशतवादी संघटनेसाठी पुरवला गेल्याचे म्हटले आहे. म्यानमार, थायलंडमधून मोठ्या प्रमाणात तस्करी होते.

अरूणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, आणि त्रिपूरा या उत्तर पूर्व राज्यांमार्फत हे अमली पदार्थ भारतात आणले जातात. ही राज्ये गेल्या दहा वर्षांपासून भाजपशासित आहेत. भाजपाचे सरकार असतानाही ड्रग्जच्या व्यवहारांवर कारवाई होत नसल्याने शंका निर्माण झाल्या आहेत. पुणे-नाशिकच्या भागात अमली पदार्थ तस्करी करणारी रॅकेट असताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई का केली नाही, हे जनतेला सांगावे, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR