सोलापूर : खरे तर दिवाळी झाल्यावर तुळशीच्या लग्नापासून विवाह सोहळ्याची धूम सुरू होते. पण यंदा लग्नसराईपूर्वीच विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्याने पारंपरिक वाद्यांना मागणी वाढली आहे. यात हलगी आणि ढोल-ताशा, वाजंत्रीचा गाजावाजा होऊ लागला आहे. त्यांचा आवाज वाढल्याचे गल्लोगल्ली दिसून येत आहे.
विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून हलगीसह वाजत्र्यांना मागणी वाढली आहे. एकीकडे उमेदवारांच्या प्रचाराचा धुराळा उडतोय. सर्वच पक्षांसह अपक्ष यांच्याकडून ढोल, ताशा, बेंजो पथक बूक केले जात आहेत. शहरात सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत, तर सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत विविध भागांत उमेदवार प्रचार करीत आहेत. उमेदवारांबरोबर प्रचारासाठी त्यांना वातावरणनिर्मितीसाठी जावे लागत आहे. चार तासांसाठी एक हजार ते बाराशे रुपये आकारले जात आहेत. यामुळे लग्रसराईपूर्वीच हलगी आणि ढोल-ताशा वादकांना ‘अच्छे दिन’ आले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रत्येक उमेदवार हलगी आणि ढोल-ताशा बूक करत आहेत. प्रचारफेरीदरम्यान वातावरण निर्मितीसाठी मागणी वाढली आहे. लग्न समारंभास लवकरच प्रारंभ असल्याने वादकांची आणि वाजर्त्यांची धावपळ होणार आहे. विधानसभेच्या प्रचारामुळे कलावंतांना रोजगार मिळत आहे. राजकीय पक्षांसह अपक्षांकडून हलगी आणि ढोल-ताशांना मागणी आहे. यात वाद्य वाजवणा-या पथकातील वादकांना चहा, नाष्टा, जेवण देण्यात येते. यापूर्वी सण, उत्सव असल्यावर वादकांना काम मिळत होते. मात्र दिवाळीपूर्वीच विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्याने त्यांच्या हाताला काम मिळाले आहे.