नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतातून परदेशात बासमती तांदळाची मागणी सध्या प्रचंड वाढली आहे. सौदी अरेबिया, इराण, इराक आणि अमेरिकेत भारताच्या तांदळाला मोठी मागणी वाढली असून एप्रिल ते जुलैमध्ये बासमतीच्या निर्यातीत १५ टक्क्यांची वाढ झाली आहे.
गेल्या वर्षी बासमती तांदळाची निर्यात साधारण १.७७४ अब्ज एवढी होती. भारत हा जगातील बासमती तांदळाचा मोठा उत्पादक आहे. २०२३-२४ वर्षात भारताने ५.८३ अब्जाहून अधिक किमतीचा सुगंधी तांदूळ निर्यात केला. ज्यापैकी दोन तृतीयांशाहून अधिक तांदूळ पश्चिम आशियामध्ये निर्यात झाला.
द बिझनेस लाइनच्या अहवालानुसार, जर आपण निर्यातीच्या प्रमाणाबाबत बोललो तर, भारताने यावर्षी एप्रिल-जुलै दरम्यान १९.१७ लाख टन बासमती तांदळाची निर्यात केली आहे, तर वर्षभरापूर्वी याच कालावधीत १६.०९ लाख टन निर्यात झाली होती. म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेत यंदा प्रमाणानुसार १९ टक्क्याने निर्यात वाढली आहे.
एप्रिल ते जुलैमध्ये सौदी अरेबीयाला ३.८१ लाख टन बासमतीची निर्यात करण्यात आली होती. अमेरिकेत बासमतीची निर्यात ४२ टक्क्यांनी वाढली. यंदा भारताने ९०,५६७ टन निर्यात केली असून मागच्या वर्षी ही निर्यात ६३,७०० टन होती. सौदी अरेबिया, इराण, इराक आणि युनायटेड स्टेट्स सारख्या देशांच्या मागणीनुसार चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जुलै कालावधीत भारताच्या बासमती तांदळाची निर्यात वाढून २.०३६ अब्ज डॉलर्स झाली आहे.