नांदेड : प्रतिनिधी
जिल्ह्यामध्ये अवैध गौण खनिज उत्खनन आणि बेकायदेशीर वाहतुकीविरोधात विशेष मोहीम तीव्र करण्यात आली आहे. रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई करत पोलिसांनी अवैध रेतीची वाहतूक करणारा हायवा टिपर जप्त केला असून, ४० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिका-यांना दिनांक २० जुलै रोजी माहिती मिळाली की, मुखेड ते नरसी रोड मार्गे एमएच २६ बीई ९५५५ या हायवामधून विनापरवाना बेकायदेशीर रेतीची वाहतूक केली जात आहे. पोलिसांनी तातडीने सापळा रचून पुणे ट्रॅफिक पॉईंट, नरसी रोड येथे सदर हायवा अडवला. वाहनाची पाहणी करून चालकाकडे चौकशी केली असता, त्याने आपले नाव सहदेव एकनाथ ढगे (रा. महाटी, ता. मुदखेड, जि. नांदेड) असे सांगितले. वाहनातील रेतीबाबत त्याच्याकडे कोणतीही वैध कागदपत्रे किंवा रॉयल्टीचा परवाना आढळून आला नाही.
या कारवाईत काळी रेती (५ ब्रास) २० हजार, हायवा टिपर ४० लाख असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४९/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रामतीर्थ पोलीस करत आहेत. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, उपविभागीय पोलीस अधिकारी (बिलोली) शाम पानेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली रामतीर्थचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्राम हराळे व पोलीस अंमलदार सूर्यवंशी, रिंदकवाले, पठाण यांनी पार पाडली.
















