Homeमनोरंजनअभिनेत्री सोनाली बेंद्रे अडचणीत?

अभिनेत्री सोनाली बेंद्रे अडचणीत?

मुंबई : मावळ तालुक्यातील उकसान येथील शेतजमिनीच्या वादावरून बॉलिवूडची प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि तिचा नवरा गोल्डी बहल अडचणीत सापडले आहेत. स्थानिक शेतकरी चंद्रकांत शिंदे यांनी वडगाव मावळ येथील दिवाणी न्यायालयात दावा दाखल करत संबंधित जमीन ही वडिलोपार्जित कुळ हक्काची असल्याचा दावा केला आहे.

कुळ कायद्यानुसार १९५७ पूर्वीपासून ताब्यात असलेल्या ३० गुंठे जमिनीवर हक्क असताना, खोट्या कागदपत्रांच्या आधारे हा हक्क डावलून जमीन सोनाली बेंद्रे आणि त्यांच्या पतीने विकत घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तसेच जमिनीच्या ठिकाणी येऊन शिंदे कुटुंबांना दमदाटी केल्याचाही आरोप फिर्यादीची वकील वनराज शिंदे यांनी केला आहे. संबंधित जागेवर बेकायदेशीर बांधकामाचा प्रयत्न आणि कुटुंबीयांना दमदाटी केल्याचाही आरोप आहे.

या प्रकरणी आधी पोलिसांत तक्रारी दाखल झाल्या होत्या, मात्र हे प्रकरण दिवाणी स्वरूपाचे असल्याने न्यायालयात दाद मागण्यात आली. सध्या न्यायालयात मनाई आदेशाची मागणी करण्यात आली असून, पुढील सुनावणी २० एप्रिल रोजी होणार आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे मावळ तालुक्यातील उकसान गावात एकच खळबळ उडाली आहे.

तर दुसरीकडे सोनाली बेंद्रे यांचे वकील राजू शिंदे यांनी हे आरोप फेटाळून लावले असून फिर्यादी शेतकरी हे प्रसिद्धीसाठी आणि पैसे उकळण्याच्या उद्देशाने सिनेतारका सोनाली बेंद्रे आणि तिचा नवरा गोल्डी बहल यांची बदनामी करण्याचा डाव आखत आहेत, असे म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR