28.9 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeसंपादकीय‘आदित्य’ची उत्तुंग भरारी!

‘आदित्य’ची उत्तुंग भरारी!

भारतीय अवकाश संशोधन संस्था ‘इस्रो’ने नव्या वर्षात आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. गतवर्षी चांद्रयान मोहिमेच्या उत्तुंग यशानंतर सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आखण्यात आलेली आदित्य एल-१ ही पहिलीच मोहीम शनिवारी (६ जानेवारी) यशस्वी झाली. आदित्य एल-१ने आपल्या नियोजित ‘हॅलो ऑर्बिट’मध्ये प्रवेश केला. सूर्य आणि पृथ्वीदरम्यान लँग्रज पॉईंट-वन सभोवतालच्या हॅलो कक्षेमध्ये आदित्य एल-१ प्रस्थापित करणे ही अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक कामगिरी इस्रोने पहिल्याच प्रयत्नात यशस्वी करून संपूर्ण अंतराळ विश्वात आपले स्थान पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. तब्बल १२५ दिवसांचा प्रवास करून आदित्य एल-१ शुक्रवारी लँग्रज पॉईंट-१ च्या जवळ पोहोचले होते. या १२५ दिवसांच्या प्रवासात आदित्यने पृथ्वीभोवती ४ प्रदक्षिणा घातल्या होत्या. लँग्रज पॉईंटजवळ पोहोचल्यानंतर या बिंदू भोवतालच्या हॅलो कक्षेमध्ये आदित्य एल-१ प्रस्थापित करणे ही कामगिरी अत्यंत खडतर आणि गुंतागुंतीची होती. ती फत्ते झाल्याने आता आदित्य या कक्षेतून सूर्याभोवती फिरून सूर्याचा अभ्यास करणार आहे.

या अभ्यास मोहिमेचा कालावधी ५ वर्षाचा असणार आहे. पृथ्वीवरून सूर्याचे निरीक्षण किंवा सूर्याच्या पृष्ठभागावर सातत्याने होणा-या घडामोडींचा अभ्यास करताना ज्या अडचणी येतात त्या हॅलो कक्षेतून निरीक्षण केल्याने दूर होणार आहेत त्यामुळे सूर्याबद्दल आपल्याला माहित नसलेली रहस्ये उलगडण्यास मदत होणार आहे. आदित्यचा हॅलो कक्षेत यशस्वीरित्या प्रवेश ही संपूर्ण खगोल विश्वासाठी अभिमानाची बाब आहे. सूर्याला गवसणी घालण्यासाठी घेतलेली ही उत्तुंग भरारीच होय. आता सूर्याचे पृथ्वीच्या तुलनेत अगदी जवळून निरीक्षण करण्याची आणि सूर्याचा बारकाईने अभ्यास करण्याची संधी आपल्याला प्राप्त झाली आहे. आदित्य एल-१ वर असलेल्या ७ उपकरणांपैकी ‘सोलार अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग’ टेलिस्कोप (एसयूईटी) ही शक्तीशाली दुर्बिण आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिट्युटमध्ये तयार करण्यात आली आहे. आदित्यच्या यशामुळे भारताने आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे. अत्यंत क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या अंतराळ मोहिमा साकारण्यासाठी आपल्या वैज्ञानिकांनी केलेल्या अथक समर्पणाचा हा पुरावाचा म्हणावा लागेल. चांद्रमोहिमेच्या अभूतपूर्व यशानंतर इस्रोने नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात सौर मोहीमदेखील फत्ते करून दाखवली आहे. इस्रोने २ सप्टेंबर २०२३ रोजी प्रक्षेपित केलेले आदित्य एल-१ यान १२५ दिवसांत १५ लाख किलो मीटरचा प्रवास पूर्ण करून शनिवारी अंतराळातील लँग्रेस-१ या बिंदूजवळ पोहोचले.

यानाला या बिंदू भोवतालच्या ‘हॅलो’ कक्षेत यशस्वीरित्या स्थापित करून इस्रोने इतिहास रचला. अशा प्रकारची भारताने अंतराळात पाठवलेली ही पहिलीच सौर वेधशाळा आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एल-१ हे यान श्रीहरी कोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून २ सप्टेंबर रोजी सूर्याच्या दिशेने झेपावले होते. हे यान पृथ्वीपासून १५ लाख कि. मी. अंतरावर असलेल्या एल-१ या बिंदूवरून सूर्याचा अभ्यास करणार आहे. सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील अंतर १५० दशलक्ष कि. मी. आहे. म्हणजे सूर्य आणि पृथ्वी यांच्यात जे अंतर आहे त्या अंतराच्या एक टक्का एवढे अंतर पार करून यानाने आपले नियोजित स्थळ गाठले. १२६ दिवसांच्या प्रवासानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांना हे यान ठरलेल्या ठिकाणी ‘पार्क’ करण्यात यश आले. या अभूतपूर्व यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. अत्यंत जटील आणि गुंतागुंतीच्या अंतराळ मोहिमा यशस्वी करण्यासाठी आपल्या शास्त्रज्ञांनी जे अथक परिश्रम घेतले त्यामुळेच हे यश मिळाले, असं पंतप्रधान म्हणाले. इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ म्हणाले, ही जी अवकाश वेधशाळा आहे ती सर्व विश्वाची आहे.

या वेधशाळेकडून जी माहिती प्राप्त होईल ती जगातील सर्व संशोधकांना उपलब्ध होईल. अशा प्रकारची मोहीम हाती घेणारा भारत हा चौथा देश आहे. या यशामुळे भारताने अवकाश विज्ञानाच्या क्षेत्रात किती मोठी झेप घेतली आहे ते लक्षात येते. नियोजित स्थळी ५ वर्षे कार्यरत राहण्यासाठी सुमारे ६० किलो इंधनाची गरज असते. प्रत्यक्षात आपल्याकडे ११० किलो इंधन शिल्लक आहे. म्हणजे हे यान ५ वर्षांपेक्षा अधिक काळ कार्यरत राहू शकेल. अर्थात यानातील साधनसामुग्री आणि अन्य अनेक गोष्टींवर हे सारे अवलंबून राहील, असे सोमनाथ यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या मोहिमेत महिलांचे योगदान मोठे असल्याचा उल्लेख करून इस्रोच्या या मोहिमेमुळे महिला सक्षमीकरणाने आणखी वरची उंची गाठली आहे, अशा शब्दांत या मोहिमेत सहभागी झालेल्या महिला शास्त्रज्ञांचे कौतुक केले आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रकल्प संचालकपदी निगर शाजी ही महिला कार्यरत होती. प्रकल्प संचालक निगर शाजी आपल्या सहका-यांसह ८ वर्षांपासून अथक परिश्रम करीत होत्या. ५९ वर्षांच्या निगर शाजी यांनी या आधी विविध पदांवर यशस्वीपणे काम केले असून त्यांच्याकडे अवकाश संशोधन क्षेत्रातील अन्य जबाबदा-याही आहेत.

आदित्य वेधशाळेच्या माध्यमातून सूर्याची नवनवीन माहिती उपलब्ध होणार आहे. या पूर्वी अमेरिकेने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘सोहो’ नावाची वेधशाळा पाठविली होती. आदित्य एल-१ सूर्याच्या बाह्यावरणाचा अभ्यास करणार आहे. सूर्याचा अभ्यास हा कठीण असला तरी सूर्यावरच्या विविध घटनांचा अभ्यास केला जाणार आहे. सूर्याच्या जवळ कोणालाही पोहोचता येणार नसले तरी मानवजातीच्या भल्यासाठी या तप्त गोळ्याचा अभ्यास करावाच लागणार आहे. आदित्यच्या यशाच्या निमित्ताने महिला शक्तीची आवर्जून नोंद घेतली गेली ही आनंदाची गोष्ट. आज महिलांनी विविध क्षेत्रे पादाक्रांत केली आहेत यात शंका नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR