14.4 C
Latur
Thursday, November 28, 2024
Homeमहाराष्ट्रत्र्यंबकच्या संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेसाठी प्रशासन सज्ज

त्र्यंबकच्या संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेसाठी प्रशासन सज्ज

पाच लाख भाविक, सहाशेहून अधिक दिंड्या

नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर त्र्यंबक नगर परिषदेसह, प्रशासन आणि निवृत्तीनाथ मंदिर संस्थानने जोरदार तयारी केली आहे. यंदा यात्राकाळात पाच लाख भाविक येण्याचा अंदाज असून सुमारे ६०० दिंड्या त्र्यंबकमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे मात्र, नाशिक-त्र्यंबक रस्त्यावरील खड्ड्यांसह यात्रोत्सवात येणारे रहाट पाळणे, तमाशा फड यांना पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने यात्रेकरूंनी नाराजी व्यक्त केली आहे.

यंदाच्या यात्रेनिमित्त त्र्यंबक नगर परिषदेकडून यात्रेसाठी येणा-या भाविकांना दिवाबत्ती, स्वच्छता, टॉयलेट सुविधांसह आरोग्याच्या सेवा पुरविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच निर्मल वारीसाठी मोठा निधी मंजूर झाला असून जागोजागी प्लास्टिक फायबर शौचालये उभारण्यात आली आहेत. याशिवाय भाविकांसाठी विविध ठिकाणी पाण्याच्या टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पोलिसांचा चोख बंदोबस्त
त्र्यंबकमध्ये यंदाच्या यात्रेसाठी होणा-या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. यामध्ये २ डीवायएसपी, ६ पीआय, २१ पुरुष पीएसआय व एपीआय, ४ महिला अधिकारी, २१० पोलिस अंमलदार पुरुष आणि ६० महिला व पुरुष अंमलदार यांचा समावेश आहे. त्यामुळे यंदाच्या यात्रेसाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा असणार आहे.

स्वच्छतागृहांची व्यवस्था
भाविकांची संख्या लक्षात घेता त्र्यंबक नगर परिषदेने विविध ठिकाणी तात्पुरती १४०० फिरती शौचालये उभारली असून २६ ठिकाणी २५० प्रसाधनगृहे उभारली आहेत. याकामी ८ सक्षम व्हॅन, पाण्याचे २२ टँकर, पाण्याचे २०० ड्रम यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तर स्वच्छतेसाठी ४१ पुरुष व १८ महिला कर्मचा-यांची नियुक्ती केली आहे. त्याबरोबरच नगर परिषदेची १३ ठिकाणची सार्वजनिक स्वच्छतागृहे देखील भाविकांसाठी खुली असणार आहेत. याशिवाय विद्युत व्यवस्था, माहिती फलक, सुपरव्हिजन करण्याकामी ८ कर्मचा-यांची नेमणूक करण्यात आली आहे.

सीसीटीव्हींची करडी नजर
त्र्यंबकेश्वर येथील यात्रेसाठी राज्याच्या कानाकोप-यातून भाविक येत असल्याने वारक-­यांची मोठी गर्दी होते. त्यावेळी या गर्दीचा फायदा घेत काही चोरटे संधी साधण्याची शक्यता असते. तसेच लहान मुले देखील गर्दीत हरवत असतात. त्यासाठी त्र्यंबक नगर परिषदेने चोख व्यवस्था केली असून शहरातील विविध ठिकाणी ४० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. तसेच नगर परिषदेत सर्व विभागांसाठी वॉर रूम तयार करण्यात आल्या असून यामध्ये यात्रेत हरवलेल्या व्यक्ती शोधण्यासाठी स्वतंत्र वॉर रूमची व्यवस्था करण्यात आली आहे.

अशी आहे पार्किंगची व्यवस्था
बाहेरगावाहून येणा-­या खासगी वाहनचालकांना गावात वाहने नेण्यास मनाई करण्यात येणार आहे. त्यामुळे या वाहनचालकांना त्र्यंबकेश्वरच्या प्रवेशद्वाराबाहेर जागोजागी उभारण्यात आलेल्या खासगी पार्किंगमध्ये आपली वाहने लावावी लागणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR