24.7 C
Latur
Friday, June 28, 2024
Homeक्रीडाअफगाणिस्तानचा बांगलादेशवर विजय; ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर

अफगाणिस्तानचा बांगलादेशवर विजय; ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अफगाणिस्तानने टी २० क्रिकेट विश्वचषकातल्या सामन्यात बांगलादेशला हरवून इतिहास रचला आहे. राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानने बांगलादेशचा ८ धावांनी पराभव केला. या विजयासह अफगाणिस्ताने उपांत्य फेरी गाठली आहे. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचं उपांत्य फेरी खेळण्याचे स्वप्न भंगले आहे. भारतासह अफगाणिस्तान, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले.

लिटन दासने शेवटपर्यंत झुंज दिली: या सामन्यात पावसाचा व्यत्यय येत होता. डकवर्थ लुईस नियमानुसार बांगलादेशला १९ षटकांत ११४ धावांचे लक्ष मिळाले. मात्र बांगलादेशचा संघ १७.५ षटकांत १०५ धावांत सर्वबाद झाला. बांगलादेशसाठी सलामीवीर लिटन दासने शेवटपर्यंत झुंज दिली, पण संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. लिटन दासने ४९ चेंडूत नाबाद ५४ धावा केल्या. त्यानं आपल्या खेळीत ५ चौकार आणि १ षटकारांची आतषबाजी केली. पण त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. बांगलादेशच्या ९ फलंदाजांना दुहेरी आकडाही पार करता आला नाही.

अफगाणिस्तानकडून कर्णधार राशिद खान आणि नवीन उल हक यांनी सर्वाधिक ४-४ विकेट घेतल्या. याशिवाय फजलहक फारुकी आणि गुलबदीन नायब यांना प्रत्येकी १ विकेट मिळाल्या.
अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खाननं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या अफगाणिस्तानची सुरुवात चांगली झाली. अफगाणिस्तानचे सलामीवीर रहमानुल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान यांनी ५९ धावा जोडल्या. रहमानउल्ला गुरबाजने ५५ चेंडूत ४३ धावांची खेळी केली.

त्याने आपल्या खेळीत ३ चौकार आणि १ षटकार लगावला. तर इब्राहिम झद्राननं २९ चेंडूत १८ धावांचे योगदान दिलं. अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खाननं शेवटच्या षटकांमध्ये १० चेंडूत १९ धावा केल्या. अशा प्रकारे अफगाण संघाने २० षटकात ५ विकेट गमावत ११५ धावा केल्या होत्या. बांगलादेशकडून रिशद होसेन हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. रिशाद हुसेननं ४ षटकात २६ धावा देत ३ बळी घेतले. याशिवाय तस्किन अहमद आणि मुस्तफिजुर रहमान यांना प्रत्येकी १ विकेट मिळाल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR