जेरुसलेम : इस्रायल आणि हमास यांच्यातील सात दिवसांची युद्धविराम संपल्यानंतर शुक्रवारी सकाळी पुन्हा लढाई सुरू झाली. इस्त्रायली बॉम्बहल्ल्याचा आज शनिवारी दुसरा दिवस आहे. दरम्यान, इस्रायल आणि हमास यांच्यातील तात्पुरता युद्धविराम संपल्यानंतर गाझापर्यंत कोणतीही मदत पोहोचलेली नाही. गाझामध्ये मानवतावादी मदत थांबली आहे. पॅलेस्टिनी निर्वासितांसाठी काम करणाऱ्या युनायटेड नेशन्स रिलीफ एजन्सीने (युएनआरडब्लूए) ही माहिती दिली आहे.
यूएनआरडब्ल्यूएच्या प्रवक्त्या ज्युलिएट टॉमा यांनी माध्यमांना सांगितले की, त्यांना आठवड्यापूर्वी अस्तित्वात असलेली परिस्थिती परत येण्याची भीती वाटत आहे. काही दिवसापूर्वी गाझाची संपूर्ण नाकेबंदी करण्यात आली होती आणि वेढाा घालण्यात आला होता. त्या म्हणाल्या की, मानवतावादी मदत पुन्हा सुरू करण्यासाठी आणि युद्धविरामासाठी सतत प्रयत्न केले जात आहेत. गाझामधील मानवाधिकार उल्लंघनाच्या सुनामीच्या उंबरठ्यावर आपण उभे आहोत, असे त्या म्हणाल्या.
इस्रायलचे म्हणणे आहे की त्यांची लढाऊ विमाने गाझा पट्टीतील हमासच्या स्थानांना लक्ष्य करत आहेत. इस्रायली लष्कराचे म्हणणे आहे की तात्पुरत्या युद्धबंदीनंतर त्यांनी गाझामधील ४०० हून अधिक लक्ष्यांना लक्ष्य केले आहे. दरम्यान, इस्रायलने गाझामध्ये पुन्हा बॉम्बफेक सुरू केल्यानंतर आतापर्यंत १७८ पॅलेस्टिनींचा मृत्यू झाल्याचे हमासच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच हमासने ओलीस ठेवलेल्या इस्रायलींपैकी सहा जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. गाझा येथे राहणाऱ्या ७० वर्षीय ओफ्रा किदार यांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. ७ ऑक्टोबर रोजी ती फिरायला बाहेर पडली होती तेव्हा तिला ओलीस बनवण्यात आले होते.