28.6 C
Latur
Monday, February 3, 2025
Homeराष्ट्रीयमहाकुंभातील चेंगराचेंगरीनंतर मृतदेह नदीत फेकले

महाकुंभातील चेंगराचेंगरीनंतर मृतदेह नदीत फेकले

नवी दिल्ली : प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभातील चेंगराचेंगरीबाबत विरोधक सातत्याने टीका करत आहेत. आता समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी या दुर्घटनेबाबत यूपी सरकारवर मोठा आरोप केला आहे. अपघातानंतर भाविकांचे मृतदेह गंगा नदीत फेकल्याचा दावा जया बच्चन यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

संसद भवन संकुलात मीडियाशी बोलताना जया बच्चन म्हणाल्या की, महाकुंभ चेंगराचेंगरीची घटना सध्या देशातील सर्वात मोठी घटना आहे. त्यांनी मृतांची नेमकी संख्या उघड करून जनतेला स्पष्टीकरण द्यावे. ते खोटे बोलत आहेत. व्यवस्था सामान्य माणसांसाठी नसून व्हीआयपींसाठी होती. महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर मृतदेह नदीत फेकण्यात आले आणि त्यामुळे पाणी प्रदूषित झाले. हेच पाणी लोकांपर्यंत पोहोचत आहे. सध्या सर्वात जास्त दूषित पाणी फक्त कुंभात आहे, त्याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिले जात नाही अशी टीका जया बच्चन यांनी केली.

चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू
मौनी अमावस्या (२८ जानेवारी) रोजी प्रयागराज महाकुंभमध्ये संगमाजवळ चेंगराचेंगरी झाली होती. उत्तर प्रदेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या चेंगराचेंगरीत ३० जणांना आपला जीव गमवावा लागला. या अपघातानंतरच विरोधी पक्षांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली. उत्तर प्रदेशचे भाजप सरकार मृतांची आकडेवारी लपवत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

खरगे आणि धनखड यांच्यात वाद
राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यात पुन्हा एकदा संसदेत जोरदार वादावादी झाली. सोमवारी संसदेच्या वरिष्ठ सभागृहात सभागृहातील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे महाकुंभ चेंगराचेंगरीबाबत आपले म्हणणे मांडत असताना अपघातातील मृत्यूंबाबत दोघांमध्ये वाद सुरू झाला. राज्यसभेत आपल्या भाषणात मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, महाकुंभ दुर्घटनेत हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. हे चुकीचे असेल, तर कृपया मला सांगा…हा माझा अंदाज आहे.

यावर जगदीप धनखड यांनी खर्गे यांना अडवत म्हणाले, तुम्ही काय बोलताय, याचा विचार केलाय का…१००० चा आकडा सांगत आहात. यातून जगाला काय संदेश जाईल? यावर खरगे म्हणाले, अखेर किती जण मेलेङ्घयात सत्य काय आहे? निदान ही माहिती तरी द्या. माझे चुकत असेल, तर मी माफी मागतो…दरम्यान, महाकुंभातील कथित गैरव्यवस्थापनाच्या मुद्द्यावर तातडीने चर्चा करण्याची मागणी करत राज्यसभेत विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. मागणी फेटाळल्यानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी प्रथम शून्य प्रहरात आणि नंतर प्रश्नोत्तराच्या तासावर सभागृहावर बहिष्कार टाकला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR