मुंबई : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीचा निकाल महाविकास आघाडीसाठी आश्चर्यकारक आणि अनाकलनीय ठरल्याने आघाडीने आता मतदान यंत्राच्या (ईव्हीएम) विरोधात आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नजीकच्या काळात ईव्हीएमच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्धार आघाडीने केला आहे. त्यासाठी आघाडीचे नेते चर्चा करून आंदोलनाची रणनिती ठरवणार आहेत.
विधानसभा निवडणुकीचा निकाल पूर्णपणे विरोधात गेल्यानंतर आघाडीच्या नेत्यांनी पराभवाच्या कारणांचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आज स्वतंत्र बैठका झाल्या. पवार यांच्या बैठकीला निवडणुकीतील विजयी आणि पराभूत उमेदवार उपस्थित होते तर ठाकरे यांनी पराभूत उमेदवारांशी संवाद साधला. त्या वेळी दोन्ही बैठकीत ईव्हीएमच्या विरोधात सूर उमटला. टपाली मतदानात आघाडीच्या उमेदवारांना मताधिक्य असताना ईव्हीएममध्ये अपेक्षित मतदान झाले नसल्याबद्दल उमेदवारांनी आश्चर्य व्यक्त केले.
विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाकडून ९५ उमेदवार मैदानात उतरले होते. मतमोजणीच्या धक्कादायक निकालातून ठाकरे गटाचे फक्त २० उमेदवार विजयी झाले तर ७५ उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले. या सर्व पराभूत उमेदवारांनी मंगळवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. भेटीदरम्यान या सर्वांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला. ईव्हीएम मशिनमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असून याबाबत पक्षाने मोठी भूमिका घ्यायला हवी, अशी मागणी या उमेदवारांनी केली.
उमेदवारांची कैफियत ऐकल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी या सर्वांना मार्गदर्शन केले. पराभूत उमेदवारांच्या मागणीवर बोलताना ठाकरे म्हणाले, पक्षाच्या वतीने लवकरच या संदर्भात भूमिका घेतली जाईल. तत्पूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करून आंदोलन उभारले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. दरम्यान, शरद पवार यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांनी पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडले. या वेळी उमेदवारांनी मतदारसंघातील काही उदाहरणे दिली.
त्या वेळी पवार यांनी ईव्हीएमबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रारी नोंदविण्याची सूचना केली. तसेच या संदर्भात राज्य स्तरावर वकिलांची फौज उभी करण्याचा निर्णय बैठकीत झाल्याचे समजते. या बैठकीनंतर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी भोसरी विधानसभा आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतील झालेल्या मतदानाचे उदाहरण दिले. ते म्हणाले, भोसरीत ३ लाख ६५ हजार ५५ इतके एकूण मतदान झालेले असताना प्रत्यक्षात ३ लाख ७४ हजार ५४७ मतांची मोजणी झाली.
त्यामुळे वाढीव ९ हजार मते कुठून आली? असा सवाल आव्हाड यांनी केला. ४ महिन्यांपूर्वी २ लाख ४० हजार मतांनी लोकसभेची चंद्रपूरची जागा निवडून येते आणि आता १ लाखांनी पाठीमागे जाते. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत जागा आघाडीला मिळते; पण विधानसभेच्या सर्व जागा तिकडे जातात. याचा अर्थ जिल्ह्याजिल्ह्यात पॅटर्न दिला आहे, असे आव्हाड म्हणाले. यामुळे सर्व विरोधी पक्षांना बरोबर घेऊन ईव्हीएमच्या विरुद्ध जन आंदोलन उभे करण्याची गरज आहे. या बाबतची मानसिक तयारी आमची झाली आहे, असे आव्हाड यांनी सांगितले.
व्हीव्हीपॅट मतमोजणीसाठी अर्ज दाखल करण्याचे आदेश
दरम्यान, जिथे-जिथे ईव्हीएम आणि मतमोजणीमध्ये गोंधळ झाला, त्या ठिकाणी व्हीव्हीपॅट मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज करण्याचे आदेश ठाकरेंनी पराभूत उमेदवारांना दिले आहेत. या वेळी खासदार संजय राऊत, अनिल देसाई, उपनेत्या सुषमा अंधारे उपस्थित होते.
ईव्हीएमविरुद्ध कॉंग्रेसचे देशव्यापी अभियान
कॉंग्रेस पक्षानेही बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी करीत देशव्यापी अभियान चालविण्याची घोषमा केली आहे. यासंदर्भात कॉंग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बॅलेट पेपरने निवडणुका व्हाव्यात, अशी मामची इच्छा आहे. यासाठी आम्ही भारत जोडो यात्रेच्या धरतीवर संपूर्ण देशभरात अभियान चालविणार आहोत, अशी घोषणा केली. ओबीसी, एससी, एसटी, दुर्बल घटकातील लोक जे मतदान टाकत आहेत, ते वाया जात आहे, असे सांगताना देशात जातवार जनगणना झाली पाहिजे, याबाबत पुनरुच्चार केला.