सिंगापूर: एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि व्यवस्थापकीय संचालक कॅम्पबेल विल्सन यांनी शुक्रवारी सांगितले की, कंपनीने ४७० विमानांची ऑर्डर दिली आहे आणि पुढील १८ महिन्यांसाठी एअर इंडियाला दर सहा दिवसांनी एक नवीन विमान मिळेल. ते म्हणाले की, आमच्याकडे नवीन विमाने आहेत, आम्ही अनेक नवीन क्रू आणि कर्मचारी भरती करत आहोत, प्रशिक्षण प्रणाली सुधारत आहोत आणि अजून बरेच काम करायचे आहे. आम्ही चांगली प्रगती करत आहोत, असे ते म्हणाले.
विल्सन म्हणाले की, एअर इंडियाच्या बहुतांश ग्राहकांना विश्वासार्हता आणि वक्तशीरपणा हवा आहे. ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्याचे आव्हान आमच्यासमोर आहे. याशिवाय, आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर नवीन विमाने तैनात केली जात आहेत आणि बहुतेक ग्राउंडेड विमाने सेवेत आणली गेली आहेत. ते म्हणाले की, टाटाच्या मालकीच्या एअर इंडियाने आठ टक्क्यांच्या संचयी वार्षिक विकास दराने वाढणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेला सेवा देण्यासाठी ४७० विमानांची ऑर्डर दिली आहे आणि पुढील १८ महिन्यांत दर सहा दिवसांनी एक नवीन विमान घेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. विल्सन यांनी इतर विमान कंपन्यांशी स्पर्धा करण्याचा आणि एअर इंडियासाठी वाहतूक वाढविण्याचा विश्वासही व्यक्त केला.