पुणे : रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यात भीषण परिस्थिती आहे. गेल्या २४ तासांत ३७० मिलीमीटर पाऊस झाल्याने पुण्यातील स्थिती गंभीर आहे. शेकडो घरांमध्ये पाणी शिरले आहे. खडकवासला धरणातून ४० हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
नागरिकांनी आपल्या सुरक्षेची काळजी घ्यावी. घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले आहे.
पुणे जिल्हाधिकारी, पुण्याचे महापालिका आयुक्त, पिंपरी-चिंचवडचे महापालिका आयुक्त, लष्कराचे कर्नल यांच्याशी मी संपर्क साधलेला आहे. प्रशासनाकडून परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे. त्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
पुण्यातील काही भागांमध्ये पाणी साचल्याने रहिवासी अडकले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी एनडीआरएफ, पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. वेळ पडलीच तर आम्ही रहिवाशांना एअरलिफ्ट करू. यासाठी संबंधित यंत्रणेशी संपर्क साधण्यात आलेला आहे.
प्रशासनातील सर्व अधिका-यांना फिल्डवर उतरण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. रहिवाशांना सुरक्षित स्थळी नेण्याच्या सूचना केलेल्या आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे मदत पोहोचेल. त्या संदर्भात जिल्हाधिका-यांना आदेश देण्यात आलेले आहेत. लोकांनी काळजी करू नये. प्रशासन तुमच्या मदतीला आहे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. अजित पवार स्वत: कंट्रोल रूममध्ये आहेत. त्यांनी पुण्यातील परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे. ते अधिका-यांना सूचना करत आहेत. गरजूंना सगळी मदत देण्यात येईल. त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था केली जाईल, अशी माहिती शिंदेंनी दिली आहे.