मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रामध्ये सध्या सर्वाधिक चर्चेत आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना. अगदी अर्ज करण्यापासून ते या योजनेसाठी देण्यात येणा-या निधीवरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. असे असतानाच आता या योजनेच्या नावावरून अजित पवार आणि शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये वाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामागील कारण आहे अजित पवार गटाने आपल्या जनसन्मान यात्रेआधी परस्पर या योजनेच्या नावामध्ये ‘मुख्यमंत्री’ शब्द वगळला असून ‘माझी लाडकी बहीण योजना’ एवढाच उल्लेख पोस्टरवर आहे.
दरम्यान, राज्य शासनाने लोकसभा निवडणुकीनंतर मध्य प्रदेशमधील मुख्यमंत्री मेरी लाडली बहना योजनेप्रमाणे महाराष्ट्रात मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये दिले जातील असे जाहीर करण्यात आले. अंतरिम बजेटमध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी या योजनेसाठी चालू आर्थिक वर्षात ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याचे जाहीर केले. यावरून बराच वाद झाला. हा पैसा नेमका उभा कठून आणि कसा करणार याबद्दल विरोधकांनी सत्ताधा-यांवर निशाणा साधला. मात्र याच योजनेच्या नावावरून सत्तेत असलेल्या अजित पवार गटाने वेगळी भूमिका घेतल्याचे दिसत आहे.
अजित पवारांची जनसन्मान यात्रा ८ ऑगस्टपासून सुरू होत आहे. या यात्रेच्या जाहिरातीचे पोस्टर्स नुकतेच समोर आले आहेत. या पोस्टरमध्ये अजित पवार नमस्कार करताना फोटो दिसत असून त्याखाली प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ आदी ज्येष्ठ नेत्यांचे फोटो दिसत आहेत. त्या खालोखाल या यात्रेच्या पोस्टरवर ‘लाडकी बहीण योजने’ची जाहिरात करण्यात आली असून दर महिन्याला प्रत्येक महिलेला १५०० रुपये दिले जातील असे नमूद करण्यात आले आहे.
मात्र योजनेच्या नावातून अजित पवार गटाने ‘मुख्यमंत्री’ शब्द वगळला असून ‘माझी लाडकी बहीण योजना’ एवढाच उल्लेख पोस्टरवर आहे. त्यामुळे आता या योजनेच्या नावावर श्रेयवादाची लढाई सुरू आहे की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
तसेच मुख्यमंत्री हा उल्लेख अजित पवार गटाकडून मुद्दाम वगळण्यात आला आहे की इतर काही कारण यामागे आहे अशी चर्चाही सुरू आहे.