छ. संभाजीनगर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा संभाजीनगर दौरा रद्द करण्यात आला आहे. मराठा समाजाने अजित पवार यांच्या संभाजीनगर दौ-याला विरोध केला होता. पोलिसांनी अनेक मराठा कार्यकर्त्यांना देखील अटक केली होती.
अजित पवार हे आज दिवसभर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौ-यावर येणार होते. संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथे ४३ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन सकाळी १०:३० वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार होते. मात्र अजित पवार यांनी वेळेवर दौरा रद्द केला आहे. हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे दौरा रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
या संमेलनाला अजित पवारांनी येऊ नये म्हणून सकल मराठा समाजाने आवाहन केले होते. त्यामुळे या संमेलनाच्या सुरुवातीलाच मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून गोंधळ होण्याची चिन्हे होती. अजित पवार हे सकाळी १० वाजता हेलिकॉप्टरने दाखल होणार होते. संभाजीनगर जिल्ह्याची आढावा बैठक देखील अजित पवार घेणार होते. मात्र हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगत अजित पवार यांनी दौरा रद्द केला आहे.
अजित पवारांच्या दौ-याला विरोध करणा-या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. अजित पवारांच्या दौ-याला विरोध करण्याचे पत्र त्यांनी दिले होते. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत गंगापुरात न येण्याचे मराठा समाजाने जाहीर केले होते.