पुणे : प्रतिनिधी
‘खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात जावयाला तिकिट देण्यासाठी तसेच भोसरी मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांचा काटा काढण्यासाठी अजित पवार गटाच्या एका माजी आमदाराने पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेचे दोन डझन नगरसेवक शरद पवार गटाला नेऊन दिले आहेत’, असा गंभीर व खळबळजनक आरोप खेडचे अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केला आहे. ‘हिम्मत असेल तर या माजी आमदारांनी माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवावी,’ असे आव्हान मोहिते-पाटील यांनी भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांना अप्रत्यक्षरीत्या दिले आहे.
विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड महानगर तसेच ग्रामीण भागातील विधानसभा मतदारसंघात कुरघोडीच्या राजकारणाने वेग घेतला आहे. प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वी अनेक खलबते उदयाला येऊ लागली आहेत. महायुतीविरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्यात खरी लढत होणार आहे. एक अपवाद वगळता पुणे जिल्ह्यातील बहुतांशी आमदार हे अजित पवार गटाकडे आहेत. त्यांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी शरद पवार, उध्दव ठाकरे गटांकडून वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत.
महायुतीकडून विद्यमान आमदार पुन्हा निवडणुकीत असणार आहेत. त्यांना रोखणारा नवा चेहरा शरद पवार गटाला हवा आहे. यातूनच टोकाच्या राजकारणाचा मोहरा शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अजित पवार गटाच्या माध्यमातून जिल्हाभर वावरत असलेले माजी आमदार त्यांच्या गळाला लागल्याचे बोलले जात आहे.
‘खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, मी सेवेकरी फाऊंडेशनचे अध्यक्ष सुधिर मुंगसे, माजी सभापती रामदास ठाकूर यांच्या नावांची उमेदवारीसाठी चर्चा आहे. तर भोसरी मतदारसंघाचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांना थोपविण्यासाठी नगरसेवक अजित गव्हाणे यांना पक्षात प्रवेश देण्यात आला आहे. खेडमधून इच्छुक असलेले सुधीर मुंगसे हे लांडे यांचे जावई आणि भोसरी मतदारसंघातून इच्छुक झालेले अजित गव्हाणे हे लांडे यांच्या मेहुणीचे चिरंजीव आहेत.