बीड : जिल्ह्यात २० पेक्षा अधिक शाखा असलेल्या साईराम मल्टीस्टेट बँक ही अडचणीत आली आहे. बँकेच्या सर्वच शाखा अचानक बंद असल्याने ठेवीदारांनी आपले पैसे काढण्यासाठी बँकेसमोर एकच गर्दी केली. गेल्या १३ वर्षांपासून बीडसह इतर जिल्ह्यात साईराम अर्बन या बँकेच्या २० पेक्षा अधिक शाखा असून यामध्ये १५२ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. मात्र, बँक अचानक बंद झाल्याने ठेवीदार पैसे काढण्यासाठी मोठी गर्दी करत आहेत.
दरम्यान, ठेवीदारांनी अचानक ठेवी काढल्याने बँकेत कॅश शिल्लक नसल्याचे बँकेचे संस्थापक साईनाथ परभणी यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले. सर्व ठेवीदारांचे पैसे परत देण्यासाठी काही वेळ देण्यात यावा, अशी विनंती त्यांनी ठेवीदाराकडे केली. काही दिवसांपूर्वीच बीड मधील जिजाऊ मल्टीस्टेट ही बँक बंद पडली होती आणि त्यानंतर आता साईराम मल्टीस्टेट ही खाजगी बँक अडचणीत आली आहे. त्यामुळे ठेवीदार आपल्या पैशाची मागणी करत आहेत.