सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
बीडमध्ये काही दिवसांपूर्वी पोलिस भरती झाली. इडब्ल्यूएस अंतर्गत झालेल्या भरतीमध्ये सगळी मुस्लिम मुले आहेत. हे घातक आहे, असे भाजप आमदार नितेश राणे म्हणाले. नितेश राणेंनी यावेळी मराठा आंदोलक मनोज जरांगेवर देखील निशाणा साधला आहे. मोहम्मद जिनाने हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पाडली. तीच भूमिका जरांगे पाटील घेत असतील तर आमचा विरोध आहे, असे देखील नितेश राणे म्हणाले. ते सिंधुदुर्गात माध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, नितेश राणे म्हणाले, दोन दिवसांपूर्वी मी जरांगे पाटील यांना मोहम्मद अली जिना यांची उपमा दिली. तेव्हा महाविकास आघाडीतील आणि त्याला समर्थन करणा-या ब्रिगेडी लोकांना फार झोंबले. आम्ही पहिल्या दिवसापासून एकच बोलत आहोत, आमचा मराठा समाजाला पाठिंबा आहे. आज जरांगे पाटील यांची भाषा एका राजकीय नेत्याची आहे, ते फक्त भाजपावर टीका करत आहेत, महाविकास आघाडीवर बोलत नाहीत.
मोहम्मह जिनानी हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पाडली. तीच भूमिका जरांगे पाटील घेत असतील तर आमचा विरोध आहे. मराठा समाजाच्या हिताचे बोलाल तर समर्थन देऊ मात्र राजकीय बोलले तर विरोधच असेल. माझ्याकडे इडब्ल्यूएस अंतर्गत पोलिस इडब्ल्यूएसची यादी आहे. हे घातक आहे. बीडमध्ये झालेल्या पोलिस भरतीत सगळे मुस्लिम मुलं आहेत. तुमच्या आंदोलनाचा फायदा मराठ्यांना होत नाही. यांच्या शांतता रॅलीत जावेद भाई शेख पाणी वाटत आहे. यांची शांतता रॅली मुसलमान समाजाने हायजॅक केली आहे का? यांच्या शांतता रॅलीत मराठा किती आहेत ते तपासले पाहिजे, असे देखील नितेश राणे म्हणाले.
आम्हाला विरोध करणारे मराठा समाजाचे नाहीत
नितेश राणे म्हणाले, आम्हाला विरोध करणारे मराठा समाजाचे नाहीत. मराठा समाजाने हे लक्षात घ्यावे अन्यथा हे ओबीसी आणि मराठा वादात गुंतून ठेवतील. जे आम्हाला साडेसातनंतर फोन करत आहेत त्यांनी हे लक्षात ठेवावे तुमच्या नेत्यांचे देखील फोन नंबर आमच्याकडे आहेत. तुम्ही एक फोन कराल तुमच्या नेत्यांना आमचे चार फोन जातील.
मुसलमान समाजाला उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावे
‘मातोश्री’बाहेर आलेले मुसलमान शिंदेंची माणसं होती. हा बाळासाहेबांचा झाला नाही तो त्यांचा काय होणार आहे. वक्फ बोर्डाच्या वेळी पळ का काढला याचे उत्तर मुसलमान समाजाला राऊत आणि उद्धव ठाकरेंनी द्यावे, असे नितेश राणे म्हणाले. नितेश राणे म्हणाले, वसुली गँग ‘मातोश्री’वर बसली आहे. वसुलीचा बादशाह ‘मातोश्री’वर तिस-या माळ्यावर बसला आहे. आम्हाला पण तमाशाच्या शो ची तिकिटे पाहिजे आहेत. राऊत तमाशावालाच आहे.