बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोघांना आज अटक झाली आहे. तर तिसरा आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. यावरून सगळे आरोपी पुण्यातच सापडले, त्यांना आश्रय कोणीतरी देत असेल असा संशय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी व्यक्त केला आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला २५ दिवस होऊनही अद्याप मारेक-यांना अटक झालेली नव्हती. यानंतर ४ जानेवारी रोजी सकाळी मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळेला अटक केल्याची माहिती समोर येत आहे. सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे हत्या झाल्यानंतर फरार झाले होते. आतापर्यंत जे आरोपी पकडण्यात आलेत ते पुण्यातून पकडण्यात आले आहेत. मी सकाळीच सांगितलं होतं की योग्य तपास सुरू आहे. लवकरच गुन्हेगार जेरबंद होतील. आम्हाला माहिती समजली की दोन मुख्य आरोपी ताब्यात घेतले आहेत. राहिलेला एक आरोपीही ताब्यात येईल. प्रशासनाला आणि सीआयडीला जे सांगायचं आहे ते मी सांगणार आहे.
एक आरोपी राहिला आहे तो ताब्यात येईल. त्यानंतर या सर्वांची कसून चौकशी होईल. खंडणी, हत्या करणे ही संघटित गुन्हेगारी आहे. सहा-सात मुख्य आरोपी असले तरीही हे रॅकेट खूप मोठे आहे. या गुन्हेगारांना खूप लोकांची साथ आहे. त्यामुळे त्यांना अभय मिळाले आहे, म्हणूनच त्यांनी हे घोर कृत्य केले आहे. एक राहिलेला आरोपी ताब्यात घेतल्यानंतर चांगल्याप्रकारे चौकशी होईल, असा विश्वास धनंजय देशमुख यांनी व्यक्त केला.