शिर्डी : प्रतिनिधी
शिर्डीतील साईबाबा संस्थानने मोफत जेवण बंद करावे आणि हे पैसे मुलांच्या भवितव्यासाठी, शिक्षणासाठी खर्च करावे, अशी मागणी माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केली आहे. प्रसंगी यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली तरी मागे हटणार नाही, असा इशाराही सुजय विखे यांनी दिला आहे. शिर्डीतील साईबाबा संस्थान भक्तांच्या देणगीतून दररोज पन्नास हजारपेक्षा जास्त लोकांना मोफत भोजन देत आहे. मात्र यामुळे शिर्डीत भिका-यांची संख्या वाढली असून मोफत जेवण बंद करावे आणि मुलांच्या भविष्यासाठी हा पैसा खर्च केला जावा, अशी अपेक्षा माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे.
शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज देशभरातून हजारो भाविक दर्शनासाठी दाखल होत असतात. श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणारे साईबाबा देशभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दरम्यान, साई संस्थानच्या प्रसादालयातलं मोफत जेवण बंद करा, अशी मागणी माजी खासदार सुजय विखेंनी साई संस्थान प्रशासनाकडे केली आहे. जे पैसे अन्नदानात जातात ते पैसे आमच्या मुला-मुलींच्या भविष्यासाठी, शिक्षणासाठी खर्च करावा अशी मागणी सुजय विखेंनी केली आहे. अख्खा देश इथे येऊन फुकट जेवण करतोय, महाराष्ट्रातील सगळे भिकारी इथे गोळा झालेत, हे योग्य नाही, असेही सुजय विखे म्हणाले.
इंग्लिश विषय शिकवणा-यालाच इंग्रजी येत नाही
आंदोलनाची वेळ आली तरी चालेल यासाठी आम्ही आंदोलन करू असा इशारा सुजय विखेंनी साई संस्थानला दिला आहे. शिर्डीत कोट्यवधी रुपये खर्च करून शैक्षणिक संकुल उभारण्यात आले. मात्र चांगले शिक्षक तेथे नाहीत. इंग्लिश विषय शिकवणा-यालाच इंग्रजी येत नाही. इंग्लिश विषयाचा शिक्षक मराठीत इंग्लिश शिकवतोय, याचा काय उपयोग? असे म्हणत सुजय विखेंनी साई संस्थानच्या शैक्षणिक संकुलातील शिक्षकांवर ताशेरे ओढले आहेत. शिर्डीतील शिर्डी परिक्रमा उद्घोषणा कार्यक्रमात सुजय विखे पाटलांनी भोजनालयात दर आकारावे अशी मागणी केली आहे. यावर निर्णय झाला नाही आणि आंदोलनाची वेळ आली तर आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
विखे पाटलांनी माफी मागावी- अक्षय महाराज भोसले
शिर्डीत शिक्षणासंदर्भात काही अडचणी असतील तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निश्चित मदत करतील. मात्र आलेल्या भाविकांना मोफत प्रसाद वाटप करू नये, याउलट भिकारी असे संबोधन करणे हे दुर्दैवी आहे. कारण अन्नदान क्षेत्रात सर्वसामान्य सगळेच प्रसाद घेत असतात, असे म्हणत शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी सुजय विखे पाटलांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.