ऐझॉल : भारताच्या शेजारील देश म्यानमारमध्ये २०२१ मध्ये लष्करी बंडानंतर लोकशाही पुनर्संचयित करण्याच्या मागणीसाठी व्यापक निदर्शने होत आहेत. सीमावर्ती भागात बंडखोर गट आणि जंटा आर्मी यांच्यात नुकत्याच झालेल्या संघर्षानंतर मिझोराममध्ये अजूनही तणावपूर्ण वातावरण आहे. मिझोराममध्ये म्यानमारमधून मोठ्या प्रमाणात शरणार्थी मिझोराममध्ये येत आहेत. भारतीय लष्कराच्या ईस्टर्न कमांडमधील सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, म्यानमारच्या निर्वासितांबरोबरच तेथील सैनिकांनाही भारतात प्रवेश देण्यात येत आहे. मात्र, सैनिकांना त्यांची शस्त्रे भारताकडे जमा करावी लागतील, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, बंडखोर गटांनी लष्कराच्या छावणीला लक्ष्य केले, त्यानंतर म्यानमारचे अनेक सैनिक मिझोराममध्ये आले. दरम्यान, भारतीय लष्कराच्या ईस्टर्न कमांडमधील सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, १६४३ किमी लांबीच्या म्यानमार सीमेचे रक्षण करणाऱ्या आसाम रायफल्सला केवळ देशात आश्रय घेणाऱ्या गावकऱ्यांचेच रक्षण करण्यासाठीच नव्हे तर म्यानमारच्या सीमेचे रक्षण करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. म्यानमारचे नागरिक आणि म्यानमारच्या लष्कराच्या जवानांनाही प्रवेश दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
ईस्टर्न कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ लेफ्टनंट जनरल राणा प्रताप कलिता यांनी मंगळवारी ही माहिती दिली. गेल्या आठवड्यात म्यानमारमधून ५००० शरणार्थी भारतात दाखल झाले आणि म्यानमार लष्कराच्या ६० सैनिकांना म्यानमारकडे परत देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केले.