मुंबई : प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमीच चर्चेत असतात. त्यांची एक गायिका म्हणून स्वतंत्र ओळख आहे. आता पुन्हा एकदा अमृता एका नव्या गाण्यासह प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. अमृता फडणवीस यांनी थेट बॉलिवूडमध्ये धमाका केला आहे. आगामी बहुचर्चित चित्रपट ‘वेलकम टू द जंगल’मधील ‘दीवाने हैं’ या गाण्याला त्यांनी आवाज दिला आहे.
‘वेलकम टू द जंगल’मधील ‘दीवाने हैं’ हे गाणे अमृता फडणवीस आणि प्रसिद्ध गायक-संगीतकार आनंद राज आनंद यांनी गायले आहे. या गाण्यात अक्षय कुमार, सुनील शेट्टी, रवीना टंडन, दिशा पाटनीसह इतर कलाकार नाचताना दिसत आहेत. काही तासांमध्येच या गाण्याला लाखांपेक्षा अधिक लोकांनी पसंती दर्शवली आहे. अहमद खान दिग्दर्शित आणि साजिद नाडियाडवाला निर्मित ‘वेलकम टू द जंगल’ हा चित्रपट २६ जून २०२६ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.
















