28.9 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeसोलापूरनदी पुनर्जीवनासाठी नांगरणीचा पर्याय, माण नदीतील प्रयोग

नदी पुनर्जीवनासाठी नांगरणीचा पर्याय, माण नदीतील प्रयोग

सोलापूर : जिल्ह्यातील अनेक लहानमोठ्या नद्यांना ओढ्याचे रूप येत आहे. यासाठी नदी खोलीकरण व रुंदीकरण या पर्यायाबरोबरच नदीची नांगरणी करण्याचा प्रयोग माणगंगा भ्रमण संस्थेच्या माध्यमातून वैजिनाथ घोंगडे यांनी सुरू केला आहे. भूजल पातळीच्या वाढीसाठी एक चांगला उपक्रम म्हणून याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नदीचा प्रवाह व त्याच्या काठावर असणारे वृक्षवेली, औषधी वनस्पती, फळझाडे, फुलझाडे, पशू-पक्षी, नदीतील पाणी शुद्ध करणारे वाळूचे थर, जलचर अशा वैभवसंपन्न नद्यांच्या काठी पूर्वजांनी पाण्याच्या सोयीसाठीच गावे वसवली होती.मात्र, नद्यात गाळ साचल्याने मृतवत झाल्यामुळे गावे संकटग्रस्त झाली असून, पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. मृत अवस्थेत असणाऱ्या नदीला कार्यरत करण्यासाठी माणगंगा संस्थेच्या माध्यमातून वैजिनाथ घोंगडे हे नदी पुनर्जीवित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी नदीक्षेत्रात नांगरट हाती घेण्यात आली आहे.

वाढेगाव (ता. सांगोला) येथे २०१४ मध्ये लोक सहभागातून बंधान्याच्या पाणीसाठा क्षेत्रात वाढलेल्या चिलार बाभळीचे निर्मूलन केले. नदीपात्रातून पाझर वाढून आसपासच्या विहिरींनापाणी वाढेल या उद्देशाने २०१५ मध्ये नदीपात्राची नांगरणी केली. त्यावेळी बंधाऱ्याच्या पाणीसाठा क्षेत्रात नदीपात्रात आठ फुटापासून तेरा फुटापर्यंत उंचीचा गाळ होता. त्यावेळी केलेली नांगरट फारशी उपयुक्त ठरली नव्हती. त्यानंतर अनेक प्रयत्नातून आम्ही लोक सहभाग मिळवला. २०१६-१७ मध्ये कोल्हापूर पद्धतीच्या बंधान्यातून चिलार बाभळी काढल्या होत्या. त्या बंधाऱ्यातील संपूर्ण गाळ काढला व नदीपात्र स्वच्छ केले.

त्यामुळे नदीचा श्वास मोकळा झाला. २०१७ मध्ये जेव्हा पाऊस पडला व नदीला पाणी आले तेव्हा आसपासच्या विहिरी बोअरला दोन दिवसात पाणी वाढले.मी संपूर्ण माणनदीचा १६५ कि.मी.चा पायी प्रवास केला. नदीपात्राची निरीक्षण नोंदवली आहेत. नदीपात्रात साचलेला गाळ काढून शेतक-यांना मोफत भरून दिला. पूर्वी नदीला पाणी आले की, नदीपात्रातून पाझराद्वारे जाणाऱ्या पाण्याने ३-४ किलोमीटर परिसरातील विहिरींना लगेच पाणी वाढत असे. मात्र, गेल्या वीस वर्षात नदीतील परक्युलेशन प्रक्रियाच बंद पडली होती. ती आम्ही आता पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. असे माणगंगा भ्रमण संस्थेचे अध्यक्षवैजिनाथ घोंगडे यांनी सांगीतले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR