15.6 C
Latur
Friday, January 3, 2025
Homeसंपादकीय विशेष‘प्रेरणा’दायी पाऊल

‘प्रेरणा’दायी पाऊल

यंदाच्या नौदल दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाने पहिल्यांदाच आपल्या युद्धनौकेवर स्त्री कमांडिंग ऑफिसरची नेमणूक केली. महाराष्ट्राच्या कमांडर प्रेरणा देवस्थळी असे या पहिल्यावहिल्या महिला कमांडिंग ऑफिसरचे नाव आहे. त्या सध्या आयएनएस चेन्नई या युद्धनौकेवर फर्स्ट लेफ्टनंट म्हणून कर्तव्य बजावत आहेत. मूळच्या मुंबईच्या असलेल्या प्रेरणा यांनी २००९ मध्ये नौदलात प्रवेश केला होता. त्यांची नियुक्ती ‘आयएनएस त्रिंकट’च्या कमांडिंग ऑफिसर म्हणून करण्यात आली आहे. अलीकडील काळात नवनवीन प्रयोगांनी भारतीय नौदल नवीन उंची गाठत आहे. यंदा एक हजार ‘अग्निवीर महिला सैनिक’ नौदलात सामील झाल्या आहेत. महिला सक्षमीकरणात भारताने टाकलेले हे पाऊल परिवर्तनकारी ठरेल यात शंका नाही.

कोकणातील सिंधुदुर्गमध्ये पार पडलेला यंदाचा भारतीय नौदल दिन अनेकार्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरला. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. त्यानुसार आता नौदलाच्या गणवेशावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा असणार आहे आणि नौदलाच्या पदांना भारतीय पद्धतीची नावं देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना पंतप्रधानांनी सशस्त्र दलांमध्ये नारीशक्ती वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. भारतीय संरक्षण विभागाच्या तिन्ही दलांत आता पुरुषांप्रमाणेच महिलांनाही संधी देण्यात येत आहे. जात, पंथ, धर्म आणि लिंग यांमधील फरक विसरून सगळ्यांना समान संधी देण्याचे भारतीय सशस्त्र दलाचे उद्दिष्ट आहे. याच उद्दिष्टाला अनुसरून भारतीय नौदलाच्या युद्धनौकेवर पहिल्यांदाच एका महिला अधिका-याची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रेरणा देवस्थळी असे या महिला अधिका-याचे नाव आहे. आयएनएस त्रिंकट या भारतीय युद्धनौकेच्या नेतृत्वपदी त्यांना नियुक्त करण्यात आले आहे. यापूर्वी कॅप्टन देवस्थळी या आयएनएस चेन्नई या युद्धनौकेवर तैनात होत्या. त्या मूळच्या मुंबई येथील असून त्यांनी सेंट झेवियर्स कॉलेजमधून मानसशास्त्रात पदवी मिळवली आहे. त्यांचा भाऊ देखील भारतीय नौदलात अधिकारी म्हणून कार्यरत आहे. प्रेरणा या टीयू-१४२ वरील पहिल्या महिला निरीक्षक आहेत. आयएनएस त्रिंकट ही युद्धनौका पश्चिम नौदल कमांडचा भाग आहे.

ती प्रामुख्याने गस्त घालणारी युद्धनौका आहे. या युद्धनौकेच्या माध्यमातून मच्छिमारांना संरक्षण दिले जात आहे. घुसखोरी करणा-याविरोधात कारवाई करणे, शोध आणि बचाव मोहिमेत महत्त्वाची जबाबदारी पार पाडणे या उद्देशाने ही युद्धनौका काम करते. ही युद्धनौका ४६ मीटर लांबीची असून तिचे वजन २६० टन आहे. ताशी ५६ किलोमीटर वेगाने धावणारी त्रिंकट युद्धनौका चार किलोमीटरपर्यंत मारा करणा-या ३० मिमी तोफने सज्ज आहे. प्रेरणा या उत्तम नॅव्हिगेशन इन्स्ट्रक्टर आहेत. तसेच नौदलाच्या ‘तोपुलेव्ह तू-१४२’ या समुद्री टेहळणी विमानाच्या निरीक्षक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे सैन्यदलांमध्ये सामील होऊ इच्छिणा-या तरुणींचे मनोबल उंचावण्यास निश्चितच मदत होणार आहे. त्यांच्यासाठी प्रेरणा या आयडॉल ठरतील यात शंका नाही. भारताच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी देशातील जवान तिन्ही सैन्य दलांत तैनात आहेत. या जवानांमध्ये देशाच्या सुरक्षेत योगदान देणा-या महिलांचाही समावेश आहे. भारतीय नौदलात अनेक शक्तिशाली महिला अधिकारी कार्यरत आहेत आणि आपल्या धाडसाने या महिला अधिका-यांनी नौदलात मोठी पदे मिळवून इतिहास रचला आहे.

भारतीय नौदलात २०२० मध्ये दोन महिला अधिकारी तैनात करण्यात आल्या होत्या. भारतीय नौदलाच्या इतिहासात प्रथमच नौदलाच्या युद्धनौकांमध्ये या दोन महिला अधिका-यांना महत्त्वाची पदे मिळाली होती. यापैकी एक होत्या कुमुदिनी त्यागी आणि दुस-या रीती सिंग. त्यांची हेलिकॉप्टर प्रवाहात ‘निरीक्षक’ (हवाई रणनीतीज्ञ) म्हणून निवड करण्यात आली. त्या देशातील पहिल्या महिला एअरबोर्न टॅक्टिशियन्स म्हणून ओळखल्या जातात. उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या कुमुदिनी त्यागी यांनी दहावीच्या परीक्षेपासून सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचे वडील सुरक्षा एजन्सी चालवतात आणि आजोबा सुरेशचंद त्यागी पोलिसांत उपनिरीक्षक होते. कुमुदिनी यांनी बी. टेक केल्यानंतर सैन्यात भरती होण्याची तयारी सुरू केली. अहोरात्र मेहनत केल्यानंतर त्या नौदलात दाखल होऊ शकल्या. कुमुदिनी यांना डिसेंबर २०१८ मध्ये कमिशन मिळाले. सब लेफ्टनंट रीती सिंग या लष्करी कुटुंबातून आलेल्या आहेत. त्यांच्या कुटुंबातील तीन पिढ्या सैन्यात कार्यरत आहेत. रीती यांचे वडील एस. के. सिंग हे भारतीय नौदलातून निवृत्त झाले आहेत. त्याची आई इंग्रजी शिक्षिका आहे.

आज केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सैन्यात, विशेषत: नौदलात महिलांसाठी संधी सतत वाढत आहेत. अनेक सशस्त्र दले एकेकाळी महिलांना समर्थन आणि प्रशासकीय भूमिका सोपवण्यापुरती मर्यादित भूमिका घेत होती. परंतु आता महिला या क्षेत्रात निर्णयप्रक्रियेतील सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचत आहेत. अमेरिकेमध्ये २०२२ च्या पाहणीनुसार, प्रत्येक सहा सक्रिय-कर्तव्य सेवा सदस्यांपैकी एक महिला आहे. या जागतिक बदलातील एक महत्त्वाचा क्षण २१ जुलै रोजी आला जेव्हा अध्यक्ष जो बायडेन यांनी अ‍ॅडमिरल लिसा फ्रँचेट्टी यांची अमेरिकन नौदलप्रमुख म्हणून नियुक्ती केली. यासाठीचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून त्या नौदलात दाखल झाल्या. चार वर्षांपूर्वी सब लेफ्टनंट शिवांगी यांनी नौदलातील पहिल्या महिला वैमानिक होण्याचा बहुमान पटकावला. भारतीय वायुदलात अनेक शक्तिशाली लढाऊ विमानांचा समावेश आहे. ही विमाने चालवण्यासाठी नौदलात अनेक दिग्गज वैमानिक आहेत. शिवांगी सिंग या त्यापैकीच एक आहेत. शिवांगी या पहिल्या महिला वैमानिक आहेत ज्यांनी राफेलसारखे शक्तिशाली लढाऊ विमान चालवले. शिवांगी सिंग या उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्यातील रहिवासी आहेत. शिवांगी यांचे आजोबा व्ही. एन. सिंह सैन्यात कर्नल होते.शिवांगी यांचे लहानपणापासूनच लढाऊ विमान उडवण्याचे स्वप्न होते. २०१७ मध्ये देशाच्या पाच महिला लढाऊ विमान वैमानिकांच्या टीममध्ये त्यांची निवड करण्यात आली. शिवांगी यांनी मिग २१ देखील उडवले आहे.

भारताचा विचार करता आपल्याकडे फेब्रुवारी २०२० मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महिलांना थेट सैन्यात भरती होण्यास, वरिष्ठ पदे, कायमस्वरूपी कमिशन आणि लढाऊ भूमिकांमध्ये प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. सध्या भारतीय सैन्यात विविध पदांवर ७,०९३ महिला आहेत. नौदलात ७४८ महिला अधिकारी आहेत (वैद्यकीय आणि दंत अधिका-यांसह) आणि हवाई दलात वैद्यकीय आणि दंत शाखा वगळता १,६३६ महिला अधिकारी आहेत. अर्थात, आंतरराष्ट्रीय स्तरावर, कॅनडा, फान्स आणि जर्मनी यांसारख्या देशांच्या सशस्त्र दलांमध्ये महिलांची टक्केवारी जास्त आहे. लष्करातील महिला त्यांच्या पुरुष समकक्षांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या राहिल्या आहेत आणि त्यांनी लष्करी सन्मान, तारे, पट्टे आणि पदकांचे समान हक्त मिळवले आहेत. २०१६ मध्ये ब्राझीलने महिलांना लढाऊ प्रशिक्षण घेण्याची परवानगी दिली. युनायटेड अरब अमिरातीने गेल्या वर्षी सीरियामध्ये इस्लामिक स्टेटविरुद्धच्या मोहिमेत महिला लढाऊ पायलटला सहभागी होण्याची परवानगी देऊन एक मोठे पाऊल टाकले होते. दक्षिण कोरियाने तर १९९० च्या दशकातच महिला लढाऊ पायलटना अधिमान्यता दिली होती. भारतीय सशस्त्र दलांमध्येही येत्या काळामध्ये महिलांच्या कर्तृत्वाच्या अनेक कहाण्या जगासमोर आदर्श ठरणा-या असतील. आज आपल्या नौदलाचे केवळ भारतातच नव्हे तर जगभरात कौतुक होत आहे.

– कॅप्टन निलेश गायकवाड

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR