मुंबई : राज्यातील गारपिटीने आणि अवकाळीने नुकसान झालेल्या भागाची माहिती घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीची बैठक बोलावली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज संध्याकाळी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राज्यातील नुकसानीचा आढावा घेतला जाणार आहे. तर, केंद्राकडून अवकाळी आणि गारपिटीने फटका बसलेल्या शेतीला मदत मिळवण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून सध्या केंद्र सरकारकडे चाळीस दुष्काळी तालुक्यांसाठी २६०० कोटींच्या मदतीची मागणी करण्यात आली असून, यावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.
पुढील दहा दिवसांत राज्यातील नुकसान झालेल्या भागाचे पंचनामे तयार करून अहवाल सादर करण्याचे सरकारने जिल्हाधिका-यांना आदेश दिले आहेत. नुकसान झालेल्या भागाचा अहवाल प्राप्त होताच केंद्राकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. सध्या राज्य सरकार तातडीची मदत देण्यासंदर्भात प्रयत्नशील असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या पार्श्वभूमीवर आज बोलावण्यात आलेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे अनिल पाटील नाशिकमधील निफाड तालुक्यातल्या नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेण्यासाठी काही वेळात पोहोचणार आहेत. स्वत: बांधावर जाऊन पाहणी करून त्यानंतर तात्काळ मुंबईत बैठकीसाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.