मुंबई : मराठी कलाविश्वात आणि बॉलिवूडमध्ये ऐतिहासिक चित्रपटांची मोठी क्रेझ पाहायला मिळते. अशातच आता भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत भव्य आणि महत्त्वाकांक्षी ऐतिहासिक प्रोजेक्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारताची अग्रगण्य चित्रपट निर्मिती संस्था अबंडंशिया एंटरटेनमेंटने आपल्या आगामी आंग्रे या भव्य चित्रपटाची अधिकृत घोषणा केली आहे. हा चित्रपट मराठा आरमाराचे अपराजित सरसेनापती म्हणजेच सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या शौर्यावर आणि अद्भूत जीवनावर आधारित असणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजेश मापुसकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून चिरंजीवी हनुमान – द एटरनल’ या चित्रपटानंतर अबंडंशिया एंटरटेनमेंट आणि राजेश मापुसकर यांची मागीज पिक्चर्स यांच्यातील हा दुसरा मोठा कोलॅबोरेशन प्रोजेक्ट आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील हा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी ऐतिहासिक चित्रपट ठरणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आखून दिलेल्या सागरी सुरक्षेच्या आणि आरमाराच्या दूरदृष्टीला सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांनी पुढे नेले. त्यांनी सलग चार दशकांहून अधिक काळ भारताच्या पश्चिम समुद्राचे ब्रिटिश आणि पोर्तुगीज आक्रमकांपासून यशस्वी रक्षण केले. अलिबाग जवळील कुलाबा किल्ल्यावरून त्यांनी आपल्या बलाढ्य लढाऊ जहाजांच्या ताफ्याचे नेतृत्व केले. युरोपियन नौदलाचा पराभव करत त्यांनी हिंदी महासागरावर मराठ्यांचे सार्वभौमत्व राखले. त्यांच्या याच ऐतिहासिक वारशाचा आदर आज भारतीय नौदलही राखते. ते आयुष्यभर अपराजित राहिले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांशी कायम एकनिष्ठ राहिले.
















