25.1 C
Latur
Wednesday, February 5, 2025
Homeमहाराष्ट्रशेतक-यांच्या प्रश्नावरील स्थगन प्रस्ताव नाकारणारे सरकार शेतकरीविरोधी

शेतक-यांच्या प्रश्नावरील स्थगन प्रस्ताव नाकारणारे सरकार शेतकरीविरोधी

नाना पटोलेंची राज्य सरकारवर टीका

नागपूर – अवकाळी पावसामुळे शेतक-यांचे नुकसान झाले होते त्याची मदत अजून मिळालेली नाही आणि आता पुन्हा गारपीट व अवकाळी पावसाने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतक-यांना भरीव मदत मिळावी यासाठी काँग्रेस पक्षाने स्थगन प्रस्ताव दिला होता, पण भाजपा सरकारने चर्चेपासून पळ काढला. केवळ भरपूर मदत दिली आहे असे म्हणून चर्चा टाळणे हा शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे, असा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या आज पहिल्याच दिवशी शेतक-यांच्या प्रश्नांवर आक्रमक झालेल्या महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पाय-यांवर जोरदार घोषणाबाजी करून शेतकरीविरोधी तिघाडी सरकारचा निषेध केला. त्यानंतर विधिमंडळ परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर तोफ डागली, ते पुढे म्हणाले की, शेतक-यांच्या प्रश्नावर भाजपा सरकार गंभीर असते तर विरोधी पक्षाच्या स्थगन प्रस्तावावर सभागृहात चर्चा केली असती पण हे सरकारच शेतकरीविरोधी असल्याने त्यांनी चर्चा करणे टाळले. देशात सर्वांत जास्त शेतकरी आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात होत आहेत.

विदर्भातील प्रश्नावर चर्चा करू म्हणणारे भाजपाचे सरकारच विदर्भातील शेतक-यांच्या प्रश्नावर चर्चाच करत नाही. हे सरकार १४ कोटी जनतेशी खोटे बोलत आहे. शेतक-यांना मदत करायची आहे की नाही ते सरकारने स्पष्ट केले पाहिजे. हिवाळी अधिवेशनाचा कालावधीही कमी आहे. जनतेच्या पैशाची उधळपट्टी करत पर्यटनासाठी हे लोक आले आहेत. जनतेच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही.

विदर्भातील शेतकरीही अनेक समस्यांना तोंड देत आहेत. अजून खरेदी केंद्रे सुरू झाली नाहीत. शेतक-याचे धान व्यापारी ४००-५०० रुपये कमी दराने खरेदी करत आहेत. भाजपा सरकार शेतक-यांच्या धानाला भावच मिळू देत नाही. धानाला अजून बोनसही जाहीर केलेला नाही. सरकारने धानाला एक हजार रुपये बोनस दिला पाहिजे अशी मागणीही पटोले यांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR