22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रप्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी बस स्थानकावर ‘आपला दवाखाना’

प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी बस स्थानकावर ‘आपला दवाखाना’

ताफ्यात लवकरच ३,४९५ नवीन गाडया

मुंबई : राज्यातील प्रत्येक बस स्थानकावर महिला बचत गटासाठी एक स्टॉल आणि जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या बस स्थानकावर ‘आपला दवाखाना’ सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी राज्य परिवहन महामंडळाला दिले.

प्रवाशांना चांगल्या सुविधेसाठी महामंडळाच्या ताफ्यात नवीन वर्षात ३ हजार ४९५ एसटी बसेस दाखल होणार असून बस स्थानकांच्या स्वच्छतेला प्राधान्य देतानाच त्यांचा चेहरामोहरा बदलण्याचे आदेशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यात ३,४९५ नवीन गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली.

महामंडळाला २० नोव्हेंबरला एका दिवशी ३६.७३ कोटी रुपये विक्रमी उत्पन्न झाल्याबद्दल शिंदे यांनी अभिनंदन केले. राज्यातील सामान्य नागरिकांना एसटीच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी महामंडळाने प्रयत्न केले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. या वेळी २२०० साध्या बस घेण्यास मंजुरी दिली. या २२०० परिवर्तन साध्या बस मार्च २०२४ अखेर एसटीच्या ताफ्यात दाखल होतील. याबरोबरच एसटीच्या २१ वेगवेगळ्या विभागांसाठी १२९५ साध्या बस भाडेतत्त्वावर घेण्याच्या प्रस्तावास बैठकीत मान्यता देण्यात आली.

सामान्यांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी राज्यात सुरू करण्यात आलेले ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ मोठ्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणच्या बस स्थानकांवर सुरू करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. या वेळी परदेशी शिक्षण अग्रिम योजना, धर्मवीर आनंद दिघे आरोग्य तपासणी योजना, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान याबाबत मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला.

माजी सैनिकांच्या पत्नींना स्टॉल
राज्यातील एकूण बस स्थानकांपैकी १० टक्के ठिकाणी माजी सैनिकांच्या पत्नींना स्टॉल देण्याच्या निर्णयाला मंजुरी देतानाच मुख्यमंत्र्यांनी महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी प्रत्येक बस स्थानकावर एक स्टॉल देण्याचे आदेश दिले. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्याशी चर्चा करून योजना तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

सामान्यांना परवडेल असे तिकिट दर
त्याचप्रमाणे एसटीतर्फे येत्या दोन वर्षांत ५१५० ई-बस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. जिल्हा आणि तालुकास्तरावर त्यांची सेवा देण्यात येणार आहे. या बससेवेकरिता सामान्यांना परवडेल असेच तिकिट दर ठेवण्याचे आदेश या वेळी दिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR