मुंबई : लोकसभा निवडणुकीत रेकॉर्डब्रेक कामगिरी केल्याने राज्यात काँग्रेस पक्षाला अच्छे दिन आले आहेत. आता आगामी विधानसभा निवडणुकीची तारीख कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेसने इच्छुक उमेदवारांकडून तिकीटांसाठी अर्ज मागवले आहेत. विशेष म्हणजे महाविकास आघाडीत असल्याने काँग्रेस साधारण १०० जागा लढवेल असे बोलले जात आहे. मात्र, तब्बल १,६८८ इच्छुक उमेदवारांनी यासाठी अर्ज केले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची बैठक पार पडली. पाच तासापासून ही बैठक सुरू होती. या बैठीकाला काँग्रेस, शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते उपस्थित होते. यावेळी नवरात्रीच्या पहिल्या आठवड्यात जागावाटप जाहीर होईल, अशी चर्चा झाल्याचे कळते आहे. तसंच आज आणि उद्या देखील यासंदर्भात मॅरेथॉन बैठक होणार आहे.
तयारीत काँग्रेसची आघाडी
मविआच्या या तयारीत काँग्रेसनं आघाडी घेतली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांचे अर्ज काग्रेसने मागवले आहेत. तसेच या आर्जांवर कार्यवाही करण्यासाठी आणि इच्छुकांच्या मुलाखती घेण्याची तयारी देखील काँग्रेसने पूर्ण केली आहे. यासंदर्भातील एक यादीच काँग्रेसकडून जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पाचही रिजनमधील मुलाखती घेणा-या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या नावांचा समावेश आहे.
आजपासून मुलाखती
दि. १ ऑक्टोबर पासून काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडणार आहेत. उमेदवारांच्या मुलाखतीसाठी काँग्रेसने नेत्यांवर जबाबदारी सोपवली आहे. १ ते ८ ऑक्टोबरपर्यंत नेते त्यांना ठरवून दिलेल्या जिल्ह्यात जाऊन मुलाखती घेणार आहेत. तसेच मुलाखती पार पडल्यानंतर हे नेते १० ऑक्टोबरपर्यंत आपला गुप्त अहवाल प्रदेश काँग्रेसकडे सुपूर्द करतील.
मुलाखतींसाठी दिग्गजांवर जबाबदारी
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी १,६८८ इच्छुक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. या इच्छुकांच्या मुलाखतींची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाण, नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, प्रणिती शिंदे, सतेज ऊर्फ बंटी पाटील, अमित विलासराव देशमुख, नितीन राऊत, यशोमती ठाकूर, विश्वजीत कदम, वसंत पुरके, नाना गावंडे या नेत्यांवर सोपवण्यात आली आहे.