31.9 C
Latur
Thursday, May 30, 2024
Homeधाराशिवअर्चनाताई पाटलांचा प्रवास थेट मिनी मंत्रालय ते संसदेच्या दिशेने

अर्चनाताई पाटलांचा प्रवास थेट मिनी मंत्रालय ते संसदेच्या दिशेने

धाराशिव : सुभाष कदम
धाराशिव लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेनेचे (ठाकरे) विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. महायुतीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेचे (ठाकरे) ओमराजे निंबाळकर यांचा मूळ राजकीय पिंड नाही.

पण, ते वडील कै. पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येनंतर अपघाताने राजकारणात ओढले गेले. त्यांचा प्रवास पहिल्याच निवडणुकीत आमदार, नंतर खासदार असा आहे. महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांचा राजकीय प्रवास मात्र थेट जिल्हा परिषद (मिनी मंत्रालय) ते संसदेच्या दिशेने सुरू आहे. त्या दोन टर्म जिल्हा परिषदेच्या सदस्य राहिल्या आहेत. दरम्यान, त्या अडीच वर्षे जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा राहिल्या आहेत. राजकारणात त्यांची महत्त्वाकांक्षा मोठी असून सासरे डॉ. पाटील व पती आ. पाटील यांच्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत त्या मोठ्या हिरिरीने भाग घेऊन प्रचार करत आलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचेही आमदार, खासदार होण्याचे स्वप्न आहे.

धाराशिव लोकसभा मतदारसंघात ओमराजे व अर्चनाताई या नात्याने दीर व भावजय यांच्यात थेट व पारंपरिक लढत होत आहे. या दोन्ही उमेदवारांसाठी राष्ट्रीय व राज्य पातळीवरील दिग्गज नेतेमंडळीच्या सभा होत आहेत. ओमराजे यांच्यासाठी माजी मंत्री अमित विलासराव देशमुख, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्या सभा झाल्या आहेत. महायुतीच्या अर्चनाताई यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ३० एप्रिल रोजी धाराशिव येथे सभा होत आहे.

महायुतीच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या सासरकडील घराण्याला मोठा राजकीय वारसा आहे. त्यांचे आजे सासरे बाजीराव पाटील (पूर्वीचे बाजीराव राजेनिंबाळकर) हे तेर गावासह परिसरातील बारा वाड्यांचे पाटील होते. सासरे डॉ. पद्मसिंह पाटील यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात विविध खात्यांचे मंत्री म्हणून काम केले आहे. पती राणाजगजितसिंह पाटील हे सध्या भाजपाचे विद्यमान आमदार असून त्यांनीही राज्याच्या मंत्रिमंडळात आठ खात्यांचे राज्यमंत्री म्हणून काम केले आहे. अर्चनाताई पाटील यांनी पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा आदी निवडणुकीत पक्षाचा प्रचार केला आहे. त्यांचे जिल्ह्यात महिलांचे मोठे संघटन आहे.

दरवर्षी त्या खास महिलांसाठी जिल्हास्तरीय हिरकणी महोत्सवाचे आयोजन करतात. सिनेसृष्टीतील अभिनेते, अभिनेत्रींना पाचारण करून महिलांना मेजवानी देण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी पहिल्यांदा राष्ट्रवादीच्या वतीने केशेगाव (ता. धाराशिव) गटातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढविली व जिंकली. दुस-या वेळेस तेर (ता. धाराशिव) गटातून निवडणूक लढविली. यावेळी त्यांना थेट महायुतीची उमेदवारी मिळाली असून जर त्या निवडून आल्या तर त्यांचा राजकीय प्रवास मिनी मंत्रालय ते थेट संसद भवन असा राहणार आहे.

ओमराजे निंबाळकर हे २००९ मध्ये पहिल्याच प्रयत्नात आमदार झाले. २०१४ मध्ये दुस-या वेळेस मात्र त्यांचा विधानसभेला पराभव झाला. २०१९ मध्ये मोदी लाटेत ते शिवसेनेचे खासदार म्हणून थेट संसदेत गेले आहेत. आता निवडून आले तर त्यांची दुस-यांदा संसदवारी होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR