धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अर्चनाताई राणाजगजीतसिंह पाटील यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. केवळ निवड प्रक्रियेची औपचारिकता बाकी आहे. तर उपाध्यक्षपदी माझी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी उषा गायकवाड यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. आज दुपारपर्यंत निवड प्रक्रिया पार पडेल आता ही निवड बिनविरोध होणार की अन्य कोण अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करणार हे निवड प्रक्रिया दरम्यान स्पष्ट होणार आहे.
मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या युतीतील शिवसेना व भाजप यांच्यात दिलजमाई झाली असून धाराशिव जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकणार हे निश्चित झाले आहे. याबाबतची माहिती खात्रीलायक व्यक्तीकडून मिळाली आहे त्यामुळे अनेक दिवसाचा हा सस्पेन्स मिटला आहे.
अर्चनाताई पाटील अध्यक्ष होण्यासाठी सावंत गटाचा विरोध होता मात्र वरिष्ठ पातळीवरील दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी स्थानिक नेत्यांची चर्चा करून हा समेट घडवून आणला असल्याचे कळते. अर्चना पाटील यांना अध्यक्ष पदाची संधी मिळणार ही चर्चा खरी ठरली असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत ही निवड प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे आता विविध विषय समित्यावर सभापती म्हणून कोणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे.
















