मुंबई : राज्यात दररोज ६ शेतकरी आत्महत्या करत आहेत परंतु भाजप युती सरकारला त्याचे काहीच सोयर सुतक नाही. राज्यातले सरकार फक्त गेंड्याच्या कातडीसारखे निगरगट्टच नाही तर नाही तर आंधळे, मुके व बहिरे आहे. या सरकारला भ्रष्टाचारापुढे शेतक-यांचे दु:ख दिसत नाही.
भाजप युतीचे सरकार हे शेतकरीविरोधी आहे. अदानी, अंबानीच्या फाईलवर सह्या करणा-या देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या हाताला शेतकरी कर्जमाफीच्या फाईलवर सही करण्यास लकवा मारतो काय? असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.
शेतक-यांच्या प्रश्नावर भाजप महायुतीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यातील शेतकरी बाबासाहेब सुभाष सरोदे यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मोबाईलमध्ये बनवलेल्या व्हीडीओत सरोदे म्हणतात की, कर्जमाफी होऊन कर्जमुक्त होईल या आशेवर मी जगत होतो, या सरकारमध्ये गोरगरिब शेतक-यांसाठी काहीच नाही म्हणून माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली.
हे ऐकून मन सुन्न झाले पण देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व अजित पवार यांना याचे काहीच वाटत नाही. आजही ‘योग्यवेळी शेतकरी कर्जमाफी करू’ असे निर्लज्जपणे सांगितले जाते पण ही योग्यवेळ किती शेतक-यांचा बळी घेतल्यावर येणार आहे? असा सवाल सपकाळ यांनी केला.
दररोज शेतकरी आत्महत्या
बाबासाहेब सरोदे यांच्या सारखे शेतकरी दररोज जीवन संपवत आहेत, मायबाप सरकारच्या मदतीच्या आशेवर जगणारा गोरगरिब शेतकरी सरकारने केलेल्या फसवणुकीमुळे निराश आणि हताश झाला आहे. शेतीसाठी लागणारे बी, बियाणे, खते, डिझेल भाजप सरकारने महाग केले, शेतमालाला भाव नाही, निसर्गही साथ देत नाही. वर्षाला ६ हजार रुपये तोंडावर मारून शेतक-यांसाठी खूप काही केले अशा गप्पा मारणारे हे भाजप युतीचे सरकार फक्त मलई खाण्यात मग्न आहे. शेतक-यांनो, या निर्ढावलेल्या सरकारच्या भरवश्यावर राहू नका, आत्महत्या करू नका, तुमच्या मुलाबाळांचा, कुटुंबियांचा विचार करा, असे कळकळीचे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.