मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. अजितदादांच्या अँटीचेंबरमध्ये ही भेट झाली. मतदारसंघातील विकास कामांसंदर्भात आपण अजितदादांना भेटल्याचे अमोल कोल्हे म्हणाले मात्र अजित पवार गटाने दाखल केलेल्या कारवाईच्या पत्रात डॉ. कोल्हेंचे नाव नसणे आणि लगेचच झालेली ही भेट यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. कोल्हे यांनी मात्र आपण शरद पवार यांच्या सोबतच आहोत. निवडणुकीतदेखील मतदारसंघातील जनता आणि शरद पवार जे सांगतील तेच करू, असेही डॉ. कोल्हे यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने अजित पवार गटाचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांना अपात्र करण्याबाबतचे पत्र राज्यसभा सभापती जगदीप धनकड यांना लिहिले आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून अजित पवार गटानेही शरद पवार गटाच्या खासदारांना अपात्र करण्याचे पत्र दिले आहे मात्र त्यात डॉ. अमोल कोल्हे यांचे नाव मात्र समाविष्ट करण्यात आलेले नाही. या पार्श्वभूमीवर डॉ. अमोल कोल्हे यांनी मंत्रालयात येऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. पत्रकारांना अधिकृत प्रतिक्रिया देताना अमोल कोल्हे यांनी, आपली ही भेट मतदारसंघातील विकास कामांबाबत होती, असे स्पष्ट केले.
डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीदेखील आहेत. ग्रामीण भागात वैद्यकीय उपचारांसाठी टर्शरी सेंटर नाहीत. वैद्यकीय उपचारांसाठी ग्रामीण जनतेला ७०-८० किलो मीटरचा पल्ला पार करून पुणे, मुंबईला जावे लागते. इंद्रायणी मेडीसिटी या प्रकल्पासाठी अजितदादांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळापासून सकारात्मक भूमिका घेतली आहे. भेटीत या प्रकल्पासंदर्भातही चर्चा झाली. पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प लवकर पूर्ण व्हावा हीदेखील मागणी आहे त्यामुळे उत्तर भारत आणि दक्षिण भारत या दोन्ही रेल्वे नेटवर्कला शिरूर मतदारसंघ जोडला जाणार आहे. मतदारसंघातील या विकास कामांसंदर्भातच आपली अजितदादांसोबत चर्चा झाल्याचे डॉ. कोल्हे म्हणाले.