सोलापूर शहरात दिवसा ढवळ््या बंदुकीचा धाक दाखवून तिघा दरोडेखोरांनी ज्वेलर्स दुकानातील लाखो रुपयांचे सोने पळवून नेले. ही घटना शनिवार दि. १३ जून रोजी सकाळी ११ च्या सुमारास शहरातील ७० फूट रोड परिसरात असलेल्या शिवकुमार ज्वेलर्स या सराफ दुकानात घडली. दिवसाढवळ््या घडलेल्या या घटनेमुळे नागरिक व व्यापा-यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोलापूर शहरातील ७० फूट रोड परिसरात शिवकुमार ज्वेलर्स या नावाचे सोन्या-चांदीचे दुकान आहे. संबंधित तिघे दरोडखोर हातात बंदूक घेऊन शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास ग्राहक म्हणून ज्वेलर्स दुकानात प्रवेश केला. दुकानात असलेल्या कर्मचा-यांवर त्यांनी अचानक बंदूक रोखली. या घटनेमुळे कर्मचा-यांत एकच खळबळ उडाली. कर्मचारी आपला जीव वाचविण्यासाठी सैरावैरा धावू लागले. त्याचवेळी तीन दरोडेखोरांनी दुकानातील काउंटरवर असलेले दागिने घेऊन घटनास्थळावरून पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दुकानात व परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी शोध सुरू केला. या दरोड्यात दुकानातील लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे समोर आले. मात्र, नेमका किती रुपयांचा ऐवज चोरून नेला, याबाबत आकडा समजू शकला नाही. भरदिवसा अचानक घडलेल्या या घटनेमुळे व्यापारी आणि नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
















