नांदेड : प्रतिनिधी
दिल्ली येथे विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि इंडिया आघाडीतील अनेक खासदारांची आंदोलनानंतर धरपकड करून पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या घटनेने काँगे्रस पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी नांदेड शहरात काँग्रेस पक्षाच्या वतीने महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी पदाधिका-यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन काहीवेळाने सोडून दिले.
दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि विरोधी पक्षातील अनेक खासदारांनी धरणे आंदोलन केले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. काँग्रेसचा आरोप आहे की, कारवाईदरम्यान राहुल गांधी यांच्याशी धक्काबुक्की करण्यात आली. झेड प्लस सुरक्षा असलेल्या विरोधी पक्षनेत्यांनाही जमिनीवरून ओढत नेण्यात आले. तसेच प्रियंका गांधी यांनाही महिला पोलिसांची पुरेशी उपस्थिती नसताना पुरुष पोलिसांकडून बळाचा वापर करून ताब्यात घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व खासदारांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आले आणि रात्री उशिरा त्यांची सुटका करण्यात आल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये झालेल्या आंदोलनात काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारवर लोकशाही दडपल्याचा आरोप केला. लोकशाही वाचवा, संविधान वाचवा, हुकूमशाहीचा निषेध असो तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी काही काळ वाहतूक रोखून धरली. अचानक रस्ता रोको करणा-या काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी व अनेक कार्यकर्त्यांची धरपकड केली आणि त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
आंदोलनादरम्यान काँग्रेस नेत्यांनी आरोप केला की, विरोधी पक्षाच्या नेत्यांशी अशा प्रकारची वागणूक देणे हे संसदीय लोकशाहीच्या परंपरेला धक्का देणारे आहे. निवडून आलेल्या खासदारांशीही जर अशा प्रकारे वागले जात असेल, तर सामान्य नागरिकांच्या अधिकारांचे काय होईल, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. पोलीस प्रशासनाने आंदोलनस्थळी बंदोबस्त ठेवत परिस्थिती नियंत्रणात ठेवली. काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला असला तरी नंतर परिस्थिती पूर्ववत झाली. दरम्यान, दिल्लीतील कारवाईबाबत काँग्रेसने केंद्र सरकारवर तीव्र टीका केली. तर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्येही काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने करून केंद्र सरकारचा निषेश केला.
















