29.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रअशोक नेते-डॉ. किरसान यांच्यात चुरस

अशोक नेते-डॉ. किरसान यांच्यात चुरस

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येकी ३ तालुक्यांचा मिळून आहे. या मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार अशोक नेते आणि काँग्रेसचे डॉ. नामदेव किरसान यांच्यात थेट लढत आहे. काँग्रेसने यावेळी विचारपूर्वक नवा चेहरा दिला असून, सुशिक्षित, सुसंस्कृत उमेदवार दिल्याने भाजपसमोर आव्हान उभे ठाकले आहे. त्यातल्या त्यात विद्यमान खासदार अशोक नेते यांच्यावरही नाराजी आहे. परंतु काँग्रेसचे नेते डॉ. नामदेव उसेंडी आणि डॉ. नितीन कोडवते थेट भाजपमध्ये दाखल झाल्याने आव्हान आहे. या निमित्ताने दोन्ही पक्षांच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया या ३ जिल्ह्यांतील ६ विधानसभा मतदारसंघांत पसरलेल्या आणि भौगोलिकदृष्ट्या लांबलचक अशा गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. भाजपमध्ये विद्यमान खासदार अशोक नेते यांना उमेदवारी मिळाली आहे, तर काँग्रेसने यावेळी दोनवेळा पराभूत झालेले डॉ. नामदेव उसेंडी यांना वगळून डॉ. नामदेव किरसान यांना उमेदवारी दिली आहे.

त्यामुळे काँग्रेसला अच्छे दिन येतील, असे वाटत असताना काँग्रेसचे नेते डॉ. नामदेव उसेंडी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन ते भाजपमध्ये दाखल झाले. तसेच काँग्रेसचे आणखी एक इच्छुक उमेदवार डॉ. नितीन कोडवते हेही सपत्निक भाजपमध्ये दाखल झाले. त्यामुळे काँग्रेसला ऐन निवडणुकीत मोठा हादरा बसला. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार या परिस्थितीवर मात करून कसे पुढे जातात, यावर पुढचे गणित अवलंबून आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे. राष्ट्रवादीचे धर्मराज अत्राम मंत्री आहेत. त्यांचीही ताकद महायुतीसोबत आहे. त्यामुळे काँग्रेसला मर्यादा आहेत. परंतु डॉ. किरसान यांनी पूर्ण ताकद लावली आहे.

गडचिरोली-चिमूरलोकसभा मतदारसंघात पहिल्याच टप्प्यात मतदान होणार आहे. डॉ. नामदेव किरसान हा काँग्रेसने नवा चेहरा दिला आहे. त्यामुळे त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण त्यांना काँग्रेसअंतर्गत असणारी नाराजी दूर करावी लागणार आहे. गडचिरोली हा विभाग माओवादीदृष्ट्या अतिसंवेदनशील आहे. या मतदारसंघातील ४२८ मतदान केंद्रे दुर्गम भागात आहेत. त्यामुळे पोलिसांचे या मतदारसंघात विशेष लक्ष आहे. तसेच नक्षलग्रस्त भागात नक्षल्यांचा धुमाकूळ घालण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने या भागाकडे विशेष लक्ष दिले जाते.

काँग्रेसचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान आणि भाजपचे विद्यमान खासदार अशोकराव नेते यांच्यात ही लढत होत आहे. नेते हे मागच्या काही वर्षांत खासदार म्हणून कार्यरत आहेत. आता त्यांच्या विरोधात नव्या चेह-याचा उमेदवार मैदानात उतरल्याने नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR