मुंबई : महिलांना औद्योगिक क्षेत्रात सक्षम करण्यासाठी तालुकास्तरावर अस्मिता भवन उभारण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी. बाजारपेठ असलेल्या तालुकास्तरावर हे भवन उभारण्यात येणार असून यामध्ये महिला आर्थिक विकास मंडळाच्या जास्तीत जास्त महिला बचतगटांना व्यवसाय करण्याची संधी प्राप्त होणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोमवारी येथे दिली.
रायगड जिल्ह्यातील रोहा येथे गारमेंट प्रकल्प कार्यान्वित करणे, तालुकास्तरावर अस्मिता भवन उभारणे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे कामकाज, राज्य बालहक्क संरक्षण आयोग तसेच १०० दिवस कृती आराखड्याबाबत आदिती तटकरे यांनी आज मंत्रालयात बैठक घेतली. यावेळी बोलताना तटकरे म्हणाल्या की श्रीवर्धन येथे सोलार फिश ड्राईंग प्रोजेक्ट अंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ मार्फत नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण उद्यम विकास प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत बाजारभिमुख उद्योग विकास घटकांतर्गत शेती, शेतीसंलग्न आणि बिगर शेती आधारित उद्योगांना तसेच नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
रोहा येथील गारमेंट प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठीचे युनिट शहरासह ग्रामीण भागातही सुरू करण्यात यावे. प्रकल्पासाठी पात्र महिलांना योग्य प्रशिक्षण आणि मानधन मिळण्यासाठी पारदर्शक कार्यप्रणाली राबवावी. या प्रकल्पाच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देशही तटकरे यांनी दिले. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या ५० व्या वर्धापन दिनानिमीत्त ‘माविम’ अंतर्गत असलेल्या जास्तीत जास्त बचतगटांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, तसेच ‘माविम’चे कार्य ग्रामीण भागातही पोहोचावे यासाठी राज्यस्तरीय महोत्सवाचे आयोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
बालसाहित्यकिांना व्यासपीठ उपलब्ध करावे
बालगृह आणि निरीक्षण गृहातील प्रवेशितांसाठी दरवर्षी राज्यस्तरीय बालमहोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवाअंतर्गत जी बालके कथा, कविता लिहितात, ज्यांचे साहित्य प्रसिद्ध आहे, अशा साहित्य क्षेत्राशी निगडीत असलेल्या बालकांसाठी विशेष व्यासपीठ या बालमहोत्सवात उपलब्ध करून देण्याचे निर्देश आदिती तटकरे यांनी दिले.या बैठकीला विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, आयुक्त कैलास पगारे, ‘माविम’च्या कार्यकारी संचालक वर्षा लटा, राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहा आदी उपस्थित होते.