16.2 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रविधानसभा निकालांचा महाराष्ट्रात परिणाम होणार नाही

विधानसभा निकालांचा महाराष्ट्रात परिणाम होणार नाही

मुंबई (प्रतिनिधी) : मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या ३ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काहीही परिणाम होणार नाही. आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आजचे चित्र दिसणार नाही. त्यात बदल होईल आणि काँग्रेस पक्ष विजयी होऊन केंद्रात सत्तेत येईल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी व्यक्त केला.

आज ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत तेलंगणा वगळता अन्य ३ राज्यांत काँग्रेसचा पराभव झाला. या पार्श्वभूमीवर आज पत्रकारांशी बोलताना पटोले यांनी या निकालांचा महाराष्ट्रावर परिणाम होणार नाही, असा दावा केला. महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचे सामाजिक न्यायाचे राज्य आहे. महाराष्ट्रात भाजपाचे विभाजनवादी राजकारण चालणार नाही. राज्यात काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. महाविकास आघाडी राज्यात आणि देश पातळीवर इंडिया आघाडी मजबूत असून आगामी निवडणुकीत जनतेचा विश्वास संपादन करू, असेही नाना पटोले म्हणाले.

तेलंगणा विधानसभा निवडणुकीत जनतेने काँग्रेस पक्षाला भरघोस मतदान करून विजयी केले आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांची अपार मेहनत, जनतेचा विश्वास यामुळे काँग्रेसला तेलंगणात मोठे यश मिळाले. कर्नाटकनंतर दक्षिण भारतातील दुस-या महत्त्वाच्या राज्यात काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. यामुळे दक्षिण भारतातून भारतीय जनता पक्षाला जनतेने दारे बंद करून भाजपच्या धर्मांध अजेंड्याला दक्षिण भारतात स्थान नाही हेच दाखवून दिले आहे,असे पटोले यांनी सांगितले.

४ राज्यांतील जनतेने दिलेला कौल काँग्रेस पक्षाला मान्य आहे. काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी चारही राज्यांत भरपूर मेहनत घेतली होती; पण लोकशाहीत जनतेचा कौल सर्वोच्च असतो तो आम्ही नम्रपणे मान्य करतो. या विधानसभा निवडणुकीत ज्या त्रुटी राहिल्या त्याचा अभ्यास करून लोकसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी करू. विधानसभेतील चित्र लोकसभेला राहत नाही. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीगडमध्ये विजयी झाला होता आणि भाजपचा मात्र पराभव झाला होता; पण ते चित्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दिसले नाही, याकडे पटोले यांनी लक्ष वेधले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR