सोलापूर : सोलापुरात आयटी पार्क स्थापनेचा आवश्यक प्रस्ताव तयार करावा. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे योग्य पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन खासदार प्रणिती शिंदे व आमदार सुभाष देशमुख यांनी दिले.
विजापूर रोडवरील ग्रॅनाईट सेंटरमध्ये शहरातील आयटी उद्योजक व स्टार्टअपधारकांची बैठक बोलावण्यात आली. यावेळी खासदार प्रणिती शिंदे, आमदार सुभाष देशमुख, आयटी उद्योजक माऊली झांबरे, अपूर्व जाधव, सुनील फुरडे, अजय गोरंटे, सचिन कोडमूर, यशपाल चितापुरे, सचिन चौधरी, जयंत हुले पाटील, सोलापूर विकास मंचाचे विजय जाधव, योगीन गुजर आदी उपस्थित होते.
यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले की, आयटी पार्क स्थापनेसाठी नेमके काय करावे यासाठी निश्चित कृती ठरवावी. त्यामध्ये केंद्राच्या अखत्यारीत असलेल्या बाबीसाठी पाठपुरावा केला जाईल. आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितले की, सोलापूर राज्यातील पहिल्या पाच शहरात असायला हवे. त्यासाठी एकदिलाने प्रयत्न करण्याची गरज आहे. विकासासाठी पक्षभेद सोडून त्याला साथ देण्याची भूमिका घेतली आहे. सोलापूर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आपण हे मांडत आहोत.
आता ही आयटी उद्योजकांनी आयटी पार्कसाठी नेमके काय करावे लागते त्याचा आराखडा तयार करावा. राज्य शासनाकडे लागणारा प्रस्ताव तयार करा. त्यानुसार उद्योग मंत्री यांच्यासोबत लवकरच बैठक आयोजित केली जाईल. सोलापूरचे तरुण पुण्यात नोकरीसाठी जात असतील त्यांना सोलापुरात करिअरच्या संधी देण्याचे काम करावेच लागणार आहे. सोलापूर मोठे करण्यासाठी हे करण्याची वेळ आली आहे.
विमानसेवा आवश्यक आहे याबाबत दुमत नाही. त्यावर काम सुरू आहे. पण त्यासोबत विकासासाठी लागणारे प्राधान्याची कामांची यादी करून त्यासाठी पाठपुरावा करावा लागणार आहे. शासनाकडे आयटी पार्कसाठी द्यावयाचा प्रस्ताव तयार होताच त्यावर शासनाची मान्यता आणण्यासाठी आपण पुढाकार घेऊ असे सांगितले.
यावेळी उद्योजकांनी हिंजवडी येथील राजीव गांधी इन्फोटेक पार्कचा अभ्यास दौरा करण्याचे ठरले. सोलापूरमधील आय. टी. कंपन्यांसाठी जीएसटी सवलतीवर चर्चा झाली. आय. टी. पार्कसाठी जागेची उपलब्धता आणि सबसिडायझ्ड ऑफिस स्पेसवर चर्चा झाली. एमआयडीसी आणि इतर संबंधित संस्थांशी समन्वय साधण्यासाठी कार्यगटाची स्थापना करण्याचे ठरले. डेटा सेंटर स्थापन करण्याबद्दल चर्चा झाली. सूत्रसंचालन माऊली झांबरे यांनी केले.