मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सने (एआय) सारे जग ढवळून निघाले असताना आता लोकसभेच्या आगामी निवडणुकीत त्या माध्यमातून आभासी वास्तव आणि आभासी अवास्तव प्रतिमांचा वापर प्रचार व अपप्रचारासाठी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रमुख राजकीय पक्षांच्या आयटी सेलच्या यंत्रणा त्याचा वापर आणि मुकाबल्यासाठी सज्ज झाल्या आहेत.
भाजपच्या अनेक खासदारांनी आपापल्या मतदारसंघात ‘एआय’चा या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून मतदारसंघातील प्रभावी लोकांच्या याद्या तयार केल्या आहेत. त्यांच्या संबंधी डेटा गोळा करून त्याचे विश्लेषण केले आहे आणि मतदार संघातील या प्रभावी मतदारांशी सातत्याने संपर्कात राहण्यासाठी कार्यकर्त्यांची यंत्रणा कामाला लावली आहे.
तमिळनाडूमध्ये ज्येष्ठ नेते ८२ वर्षीय टी. आर. बालू यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन झाले. त्यावेळी स्क्रीनवर दिवंगत नेते के. करुणानिधी आठ मिनिटे बोलले. त्यांनी बालू यांचे कौतुक केले आणि सोबतच आपले पुत्र एम. के. स्टॅलिन यांच्या कारभाराचीही प्रशंसा केली. आवाज देखील करुणानिधी यांचा होता. आर्टिफिशियल इंटेलिजन्सने हे शक्य केले. तसाच वापर लोकसभा निवडणूक प्रचारात वेगवेगळे पक्ष करू शकतात.
प्रतिमा भंजनासाठी गैरवापर शक्य
ख-या आणि ‘एआय’ने बनविलेल्या प्रतिमांमधील फरक ज्यांना कळत नाही अशा लोकांवर जाहिराती आणि संदेशांचा भडिमार करण्याची योजना राजकीय पक्षांनी आखली आहे.
‘एआय’ निर्मित दिशाभूल करणा-या व्हिडीओंचा प्रभाव रोखणे, खोटेपणा उघड करणे असे मोठे आव्हान पक्षांसमोर असेल. आगामी निवडणुकीत ‘एआय’चा चांगला वापर होण्यापेक्षा गैरवापर होण्याची शक्यता अधिक आहे.
डेटा गोळा करण्याचे काम सुरू
फेसबुकवर असलेली एक व्यक्ती राजकीय, सामाजिक स्वरूपाच्या किती पोस्ट टाकते, त्या पोस्टना त्याचे फेसबुक फ्रेंड वा अन्य लोक कसा प्रतिसाद देतात याची माहिती घेऊन ते फ्रेंड आणि त्यांचेही फ्रेंड अशांचा डेटा गोळा करण्याचे काम राजकीय पक्ष आणि विशेषत: भाजप सध्या करीत आहे. त्यातून भाजपच्या विचारसरणीचे कोण, विरोधातील कोण आणि दोन्हींसोबत नाहीत असे किती जण आहेत याची माहिती गोळा केली जात आहे. त्यासाठीही ‘एआय’चा वापर केला जात आहे.