30.7 C
Latur
Friday, May 10, 2024
Homeसंपादकीय विशेष‘बायजू’चा धडा

‘बायजू’चा धडा

एकेकाळी देशातील किंबहुना कदाचित जगातील सर्वांत मोठी अ‍ॅडटेक युनिकॉर्न कंपनी म्हणून ‘बायजू’ची खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा सबंध उद्योगविश्वात झाली. परंतु, आज ही कंपनी आपल्या अस्तित्वासाठी लढताना दिसत आहे. आता लुकआऊट सर्क्युलर जारी केल्यानंतर या कंपनीचे सर्वेसर्वो असणारे रवींद्रन देशाबाहेर जाऊ शकत नाहीत. या कंपनीची दुरवस्था ही स्टार्टअप विश्वातील नवतरुणांसह एकंदरीतच उद्योगविश्वासाठी एक मोठा धडा आहे. बायजूने ब्रँड तयार करण्यासाठी खूप पैसा गुंतवला. इंडियन प्रीमियर लीग आणि फुटबॉल विश्वचषक प्रायोजित केले. यामुळे कंपनीचे नाव घराघरांत पोहोचले. परंतु या प्रसिद्धीमुळे अर्थकारणाचा पाया कोलमडला. आता कंपनीच्या संचालकांना कर्मचा-यांचे पगार देण्यासाठी स्वत:ची आणि कुटुंबाची संपत्ती गहाण ठेवावी लागली आहे. बायजूच्या पतनामुळे अ‍ॅडटेक क्षेत्रातील गुंतवणूकदारांकडून दीर्घकाळ निधी मिळणे कठीण झाले आहे.

द्यमान केंद्र सरकारने स्टार्ट अप इंडिया या महत्त्वाकांक्षी मोहिमेचा श्रीगणेशा करण्यामागे देशातील प्रतिभावंत नवतरुणांना नवसंकल्पनांवर आधारित तंत्रज्ञानाच्या साथीने नवउद्योग स्थापन करता यावेत आणि त्यातून देशातील तरुणपिढी रोजगारक्षमच नव्हे तर रोजगारनिर्मिती करणारी ठरावी असा हेतू होता. या योजनेमुळे देशामध्ये मोठ्या प्रमाणावर स्टार्टअप्सचे जाळे उभे राहिले. विशेषत: कोविड काळात स्मार्ट तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अनेक स्टार्टअप उदयास आले. त्यातून स्टार्टअप्सची एक परिसंस्था तयार झाली. जर कोणत्याही स्टार्टअपचे मूल्य १ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचले तर त्याला युनिकॉर्न म्हणतात आणि एखाद्या स्टार्टअपचे मूल्य १० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचले तर त्याला डेकाकॉर्न म्हणतात. स्टार्टअप्सच्या विश्वातील बहुचर्चित अ‍ॅडटेक कंपनी असणारी बायजू ही भारतातील पाच डेकाकॉर्न स्टार्टअपपैकी एक म्हणून ओळखली जात होती.

बायजू रवींद्रन हे या कंपनीचे संस्थापक आणि सीईओ आहेत. कन्नूरच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी.टेक केलेले आणि इंग्लंडमध्ये नोकरी करणारे बायजू हे आयआयएमची एंट्रन्स टेस्ट १०० पर्सेंटाईलने दोनदा उत्तीर्ण झाले आहेत. मूळचे केरळमधील असणा-या रवींद्रन यांनी गणित आणि विज्ञान या विषयांचे ऑनलाईन शिक्षण देण्यास सुरुवात केली. या उपक्रमाला तुफान प्रतिसाद मिळाला. ऑनलाईन प्रवेशाची तयारी करणा-या रवींद्रन यांनी ही संकल्पना पुढे नेत थिंक अँड लर्न या नावाने स्टार्टअप सुरू केले. दोन वर्षे कठोर परिश्रम केल्यानंतर २०१३ मध्ये त्यांना पहिला निधी मिळाला. त्यानंतर त्यांनी २०१५ मध्ये ‘बायजू’ नावाने एक अ‍ॅप डिजिटल विश्वात आणले. साधारणत: २-३ महिन्यांत २० लाख लोकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले. पाहता पाहता या कंपनीची लोकप्रियता वाढत गेली. ती इतकी की, हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये बायजूचा केसस्टडीसुद्धा शिकवला जाऊ लागला.

२०१७ मध्ये, ‘बायजू’ने बॉलिवूडचा बादशहा अभिनेता शाहरूख खान याला आपल्या कंपनीचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनवले आणि २०१८ मध्ये कंपनीचे मूल्यांकन १ अब्ज पार गेल्यामुळे ‘बायजू’ हे एक युनिकॉर्न स्टार्टअप बनले. यानंतरच्या काळातही कंपनीला फंडिंग मिळत राहिले. २०१९ मध्ये ‘बायजू’ भारतीय क्रिकेट संघाचा प्रायोजक बनला. भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंच्या जर्सीवर या कंपनीचा लोगो झळकू लागला. २०२० मध्ये आलेल्या कोविड महामारीमुळे ऑनलाईन विश्वातील ‘बायजू’ला संधींचे अवकाश निर्माण करून दिले. लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडू न शकलेल्या मुलांनी या कंपनीचे पॅकेज विकत घेतले. त्यानंतर रवींद्रन यांनी वैद्यकीय आणि आयआयटी प्रवेशाची तयारी देणारे आकाश कोचिंगही सुमारे ७३०० कोटी रुपयांना विकत घेतले. २०२२ मध्ये, या कंपनीने फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला त्यांचा जागतिक ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनवले आणि कतार येथे झालेल्या फिफा विश्वचषकाची ‘बायजू’ प्रायोजक बनली. याखेरीज अनेक कंपन्यांचे अधिग्रहणही रवींद्रन यांच्या या कंपनीने केले.

परकीय गुंतवणूकदारांकडून मिळालेल्या पैशांमुळे असे सौदे सुलभ झाले. ब्लॅकरॉक, सिल्व्हर लेक, टायगर ग्लोबल यांसारख्या परदेशी गुंतवणूकदारांकडून रवींद्रन यांनी चांगली रक्कम जमा केली. बायजूच्या वाढीच्या धोरणाने विदेशी गुंतवणूकदार प्रभावित झाले. त्यांच्याकडून या कंपनीने सुमारे ५० हजार कोटी रुपये गोळा केले. या फंडिंग फे-यांमुळे बायजूचे मूल्यांकन वाढतच गेले. ‘बायजू’ भारताच्या स्टार्टअप इकोसिस्टमचा पोस्टर बॉय बनली. त्याचे प्रवर्तक रवींद्रन यांना एकापाठोपाठ एक ‘आंत्रप्रेन्योर ऑफ द इयर’ पुरस्कार मिळाले. अर्थातच यासाठी कंपनीने मार्केटिंगवर प्रचंड खर्च केला. पण बायजूला ही चमक जास्त काळ टिकवता आली नाही. कर्ज आणि निधीद्वारे जलद गतीने केलेल्या अधिग्रहणांमुळे नफा मिळू शकला नाही. दरम्यानच्या काळात, या युनिकॉर्न कंपनीवर अनेक आरोपही झाले. कोर्टकचे-या झाल्या. त्यामुळे रवींद्रन यांना आपली रणनीती बदलावी लागली. पण त्यानंतर कंपनीला तोटा होऊ लागला. दुसरीकडे, कोविडोत्तर काळात मुले ऑनलाईन शिकण्याऐवजी ऑफलाईन अभ्यास करण्यासाठी कोचिंग सेंटरमध्ये जाऊ लागली. परिणामी, ‘बायजू’मधून २५ हजारांहून अधिक कर्मचा-यांना काढून टाकण्यात आले. परदेशात विस्तार करण्यासाठी या कंपनीने कर्जही घेतले होते. त्याची परतफेड करण्यात अडचणी येऊ लागल्या. यादरम्यान, कंपनीतील अनेक वरिष्ठ अधिका-यांनी राजीनामे दिले.

त्यांचे ऑडिटर डेलॉईट यांनीही कंपनीच्या आर्थिक स्थितीबद्दल चिंता व्यक्त करत नोकरी सोडली. कंपनी आपले आर्थिक रेकॉर्ड देत नसल्याचा ठपका त्यांनी ठेवला. २०२३ मध्ये, विदेशी चलन व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून ईडीने बायजूच्या कार्यालयावर आणि रवींद्रन यांच्या घरावर छापे टाकले. जवळपास ९ हजार कोटींहून अधिक रकमेबाबत ईडीने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. संकटांची मालिका सुरू झाल्याबरोबर गुंतवणूकदारांनी दबाव आणण्यास सुरुवात केली. कर्जदात्यांचा तगादा सुरू झाला. कंपनी वादात सापडल्यामुळे मूल्यांकन खाली येऊ लागले. सद्यस्थितीत ब्लॅकरॉकने या कंपनीचे मूल्य १ अब्जापर्यंत कमी केले आहे. दुसरीकडे, कंपनीच्या गुंतवणूकदारांनी एक विलक्षण सर्वसाधारण सभा घेतली आणि बीजू रवींद्रन यांना सीईओ पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातील एका तथाकथित प्रथितयश स्टार्टअपची अशी शोकांतिका होण्यामागे आर्थिक व्यवस्थापनातील अपयश कारणीभूत आहेत. कोविडनंतर शाळा उघडल्या गेल्या तेव्हा ऑनलाईन शैक्षणिक उत्पादनांची मागणी कमी झाल्यामुळे बायजू आणि त्यांच्या गुंतवणूकदारांच्या गगनाला भिडलेल्या अपेक्षांना मोठा धक्का बसला. वास्तविक, बदललेल्या वातावरणानुसार तुम्ही तुमच्या उत्पादनात बदल करणे गरजेचे असते.

शैक्षणिक ब्रँड्सना एक ठोस ओळख विकसित करण्यासाठी अनेक दशके लागतात. पण बायजूने प्रसिद्धी आणि मार्केटिंग, ब्रँडिंगवर कमालीचा पैसा खर्च करून काही वर्षांतच ही ओळख मिळवली. परंतु प्रत्यक्षात कोणतीही संस्था, कंपनी दीर्घकाळ सुरू राहण्यासाठी नफ्याचे अर्थकारण महत्त्वाचे असते. त्याबाबत रवींद्रन हे सपशेल अनुत्तीर्ण झाल्याचे दिसत आहे. कंपनीच्या वाढत्या प्रसिद्धीमुळे गुंतवणूकदार एकामागून एक पैसे गुंतवत राहिले आणि प्रत्येक फंडिंग फेरीत बायजूची किंमत वाढत गेली. वाढत्या मूल्यांकनाचे ढोल पिटून गुंतवणूकदार पुढील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होते. जोपर्यंत फुगा वाढत होता तोपर्यंत सर्वजण आनंदी होते. पण त्याला टाचणी लागल्यानंतर सर्वच पितळ उघडे पडले. सध्या बायजू खोल आर्थिक संकटाचा सामना करत आहे आणि ईडीच्या छाप्यांचा सामना करत आहे. कंपनीच्या मालकाला आपल्या कर्मचा-यांना पगार देण्यासाठी आपले घर विकावे लागले आहे. त्यांच्या विरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे, म्हणजे तो देशाबाहेर जाऊ शकत नाहीत. नुकताच एक व्हीडीओ समोर आला आहे, ज्यात एका मुलाचे वडील परतावा घेण्यासाठी आले होते, जेव्हा त्यांना परतावा मिळाला नाही तेव्हा त्यांनी कायदा हातात घेतला आणि बायजूच्या ऑफिसमधून टीव्ही काढला आणि निघून गेला.

बायजूला आर्थिक नोंदीही वेळेवर सादर करता आल्या नाहीत. बायजूचे प्रकरण कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या मानकांशीही संबंधित आहे. जर कंपनीने गुंतवणूकदारांकडून पैसे उभे केले तर त्या पैशाचे ती काय करत आहे हे सांगायला हवे होते. पण आर्थिक वर्ष २०२१ नंतरची हिशेबपुस्तके ‘बायजू’ने सादर केलेली नाहीत, अशी परिस्थिती आहे. बडे विदेशी गुंतवणूकदारही यावर बराच काळ मौन बाळगून राहिले, ही बाब आश्चर्यकारक आहे. आता या नोंदी लवकरच समोर येतील, असे रवींद्रन सांगत आहेत; पण त्यामुळे गेलेली पत परत मिळणार का हा खरा प्रश्न आहे. तसेच या कंपनीमध्ये पैसे गुंतवलेल्या गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. हजारो कर्मचा-यांच्या नोक-या गेल्या आहेत आणि अनेकांच्या नोक-या धोक्यात आल्या आहेत. ज्या मुलांनी बायजूचे अभ्यासक्रम घेतले आहेत त्यांनाही समस्या येऊ शकतात. सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बायजूच्या पतनाचा प्रतिकूल परिणाम भारतातील इतर स्टार्टअपवरही होऊ शकतो. विशेषत: त्यांना निधीउभारणीत अडचणी येऊ शकतात. स्टार्टअप असो वा उद्योग, व्यवसाय, व्यापार असो, त्यांनी विस्ताराची स्वप्ने जरूर पाहावीत, त्यासाठी पैसाही खर्च करण्यात गैर नाही, कर्ज घेण्याबाबतही आक्षेप असण्याचे कारण नाही; पण या भांडवलातून उत्पन्न किती मिळत आहे, याचा ताळेबंद सदोदित डोळ्यासमोर असायला हवा. पण प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचण्याच्या प्रवासात व्यवसायाचे हे मुख्य सूत्रच रवींद्रन विसरले. त्याचाच हा सारा परिणाम.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR