पुणे : ललित पाटील पलायन प्रकरणानंतर पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले होते. संबंधित पोलिस अधिकारी-कर्मचा-यांनी ललित पाटील याने हिसका देऊन पळाला अशी बतावणी केली होती. यावरून ससूनमधील अधिका-यांना कोणीतरी वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे बोलल्या जात आहे.
ड्रग्ज तस्कर ललित पाटील याने ससून रुग्णालयातून २ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री आठच्या सुमारास पलायन केले होते. ललितला पळून जाण्यास मदत करणा-या आणखी दोन पोलिस कर्मचा-यांना पोलिस खात्यातून गुरुवारी (दि. ४) बडतर्फ करण्यात आले. पोलिस हवालदार आदेश सीताराम शिवणकर आणि पोलिस शिपाई पिराप्पा दत्तू बनसोडे अशी या पोलिस कर्मचा-यांची नावे आहेत. याबाबतचे आदेश अपर पोलिस आयुक्त, प्रशासन अरविंद चावरिया यांनी दिले आहेत. दरम्यान, पलायन प्रकरणानंतर दोन्ही पोलिस कर्मचा-यांना निलंबित केले होते. त्यांची या प्रकरणात विभागीय चौकशी सुरू होती. चौकशीअंती ही कारवाई केल्याचे आदेशात म्हटले आहे.
यापूर्वी पोलिस उपनिरीक्षक मोहिनी डोंगरे, पोलिस नाईक नाथाराम भारत काळे आणि पोलिस शिपाई अमित सुरेश जाधव या तिघांना बडतर्फ केले होते. या प्रकरणात बडतर्फ केलेल्यांची संख्या पाच झाली आहे. अधिक माहितीनुसार, पोलिस कर्मचारी शिवणकर, काळे, बनसोडे आणि जाधव असे चौघेजण २ ऑक्टोबर रोजी ससून रुग्णालयातील तेव्हाचा कैदी वॉर्ड क्रमांक १६ येथे गार्ड कर्तव्यावर होते. त्यांच्यावर देखरेख अधिकारी म्हणून मोहिनी डोंगरे होत्या. आरोपी ललित पाटील याने त्याच रात्री आठच्या सुमारास पोलिस कर्मचारी काळे यांच्या ताब्यात असताना ससून रुग्णालयातून पळ काढला.
ललितला एक्स-रे काढण्यासाठी घेऊन जात असताना त्याने पलायन केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. ललित पाटील याने पळ काढल्याच्या घटनेनंतर देखील कर्तव्यावर असलेल्या पोलिस अधिकारी आणि कर्मचा-यांनी याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला रात्री उशिरा म्हणजेच सव्वादहाच्या सुमारास दिली. त्यामुळे आरोपीला पळून जाण्यास संधी मिळाली. हा प्रकार घडला तेव्हा पोलिस कर्मचारी शिवणकर आणि बनसोडे हेही तेथे उपस्थित होते.
कर्तव्यात गंभीर कसूर
ललित पाटील पळाल्यानंतर दोघांनी नियंत्रण कक्षाला त्याची माहिती देणे अपेक्षित होते; तसेच ललित ‘एक्स-रे’साठी खाली काळे यांच्यासोबत गेल्यानंतर अर्ध्या तासानंतर देखील दोघांनी तो का परत येत नाही याची खात्री केली नाही. तसेच त्याला कैदी वॉर्डमधून बाहेर काढताना पुरेशी खबरदारी घेण्यात आली नाही. दोघांना कायद्याचे ज्ञान असतानाही त्यांनी अक्षम्य असा हलगर्जीपणा करून कर्तव्यात गंभीर कसूर केल्याचा ठपका या दोघांवर ठेवण्यात आला आहे; तसेच दोघांनी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम ३ चे उल्लंघन केल्याचे सिद्ध होत असल्याचे आदेशात म्हटले आहे.
पोलिस खात्याची प्रतिमा मलिन
या दोघांच्या वर्तणुकीमुळे पोलिस दलाची प्रतिमा जनमानसात मलिन झाल्याने त्यांना खात्यातून बडतर्फ करण्यात आल्याचे अपर पोलिस आयुक्त प्रशासन अरविंद चावरिया यांनी म्हटले आहे. शिक्षेच्या विरोधात या दोन्ही कर्मचा-यांना ६० दिवसांमध्ये अपर मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याकडे अपील करता येणार आहे.