तेहरान : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत विकल्या जाणा-या भारतीय मालावर २५ टक्के कर लावला आहे. याशिवाय, सहा भारतीय तेल कंपन्यांवर निर्बंधही लादले आहेत. यावरुन इराणने अमेरिकेवर अर्थव्यवस्थेला शस्त्र बनवण्याचा आणि इराण आणि भारतासारख्या स्वतंत्र देशांवर आपली इच्छा लादण्यासाठी आणि त्यांच्या विकासात अडथळा आणण्यासाठी निर्बंधांचा वापर करण्याचा आरोप केला.
भारतातील इराणी दूतावासाने गुरुवारी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की अमेरिका अर्थव्यवस्थेला शस्त्र बनवत आहे आणि इराण आणि भारतासारख्या स्वतंत्र राष्ट्रांवर आपली इच्छा लादण्यासाठी आणि त्यांच्या विकासात अडथळा आणण्यासाठी निर्बंधांचा वापर करत आहे. हे भेदभावपूर्ण आणि जबरदस्तीचे पाऊल आंतरराष्ट्रीय कायदा आणि राष्ट्रीय सार्वभौमत्वाच्या तत्त्वांचे उल्लंघन असून आर्थिक साम्राज्यवादाचे आधुनिक स्वरुप आहे अशा धोरणांना विरोध करणे गरजेचे आहे.
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयानेही गुरुवारी इराणच्या तेल व्यापारावर लादलेल्या अमेरिकेच्या निर्बंधांना दुर्भावनापूर्ण म्हटले. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी इराणच्या तेल आणि ऊर्जा क्षेत्राशी संबंधित संस्था, व्यक्ती आणि जहाजांवर अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांचा तीव्र निषेध केला आणि त्यांना दडपशाही निर्बंध म्हटले. तसेच, हा निर्णय एकतर्फी आणि बेकायदेशीर निर्बंध गुन्ह्याच्या श्रेणीत येतात. हे आंतरराष्ट्रीय कायदा आणि मानवी हक्कांच्या मूलभूत तत्त्वांचे उल्लंघन असल्याची टीकाही त्यांनी केली.