जालना : आमदार बच्चू कडू यांनी सोमवारी सकाळी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. ‘मी आंदोलक असून त्यापूर्वी काही तोडगा निघत असेल तर चांगलंच आहे’ असे म्हणत त्यांनी जरांगे यांच्याशी चर्चा केली.
दोघांच्या चर्चेमध्ये सगेसोयरे या शब्दावरून पुन्हा खल झाला. सगेसोयरे या शब्दाच्या चार व्याख्या तयार केल्या असून त्या सगळ्या व्याख्या प्रशासकीय बाबींमध्ये बसल्या पाहिजेत, त्यावर विचार सुरू आहे, असे यावेळी बच्चू कडू यांनी सांगितले.
मनोज जरांगे पाटील यावेळी बोलताना म्हणाले की, सगेसोयरे या शब्दावर चर्चा झाली आहे आणि मागेल त्याला प्रमाणपत्र द्यावे, यासंदर्भात चर्चा झाली आहे. नुसती चर्चा नाही तर २० तारखेच्या आत हे सगळे करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची मागणी आहे की काहीही झाले तरी मुंबईला जायचे आहे म्हणजे आहे.
ज्याची नोंद मिळाली त्याच्या रक्ताच्या नातेवाईकांना, सगेसोय-यांना आणि त्याच्या परिवाराला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी आमची मागणी आहे. हे होईल.. नाही होईल, परंतु आम्हाला २० तारखेला मुंबईला जायचं आहेच. वेळकाढूपणा होऊ शकतो, त्यामुळे जायचं हे ठरलेलं आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी १९ तारखेला विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी सरकारकडे केली आहे. त्यानंतर त्यांनी आंदोलनाची रूपरेषा सांगितली. यावेळी त्यांनी प्रत्येक दिवसाचे नियोजन सांगून मराठ्यांनी मुंबईकडे कूच करण्याचे आवाहन केले.