बदलापूर : प्रतिनिधी
बदलापूर घटनेचे तीव्र पडसाद चाळीसगाव आणि पाचोरा येथे उमटले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राज्य सरकारविरुद्ध आंदोलन झाले. यावेळी राज्य शासनाविरुद्ध तीव्र असंतोष व्यक्त करण्यात आला.पाचोरा येथे शिवसेना नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी देण्यात आलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
बदलापूर येथील घटना लज्जास्पद आहे. त्याहूनही गंभीर म्हणजे तक्रार घेऊन गेलेल्या गर्भवती महिलेला पोलिसांनी दहा तास पोलिस ठाण्यात बसवून ठेवले. तिची तक्रार न घेता तिलाच आरोपीच्या पिंज-यात उभा करण्याचा हा प्रकार आहे.
सबंध पोलिस आणि वरिष्ठ अधिकारी आरोपी आणि संबंधित शिक्षण संस्थेला वाचविण्यासाठी सांगण्यावरून हे सर्व करण्यासाठी धडपडत होते. ते कोणत्या सत्ताधारी राजकीय नेत्याच्या सांगण्यावरून हे करीत असावेत, वेगळे सांगण्याची गरज नाही.
या घटनेमुळे देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रिपदी राहण्याचा अधिकार गमावला आहे. त्यांच्यात थोडी जरी नैतिकता असेल तर, त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. राज्यभरातील जनता आणि विशेषत: महिला महायुती सरकारविरोधात संतप्त आहेत.
यावेळी चाळीसगाव येथील उमंग महिला समाजसेवी परिवाराच्या संपदा पाटील यांनी राज्य शासनाचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. या घटनांमुळे महिला भयभीत झाल्या आहेत. राज्य शासनाने त्याची जबाबदारी स्वीकारावी. लाडकी बहीण सुरक्षित बहीण कशी होईल यासाठी प्रयत्न करावे. कायदा आणि सुव्यवस्था अधिक कठोर करण्यासाठी सरकारने पावले टाकावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
महिलांची जोरदार निदर्शने
यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. त्यापूर्वी महिलांनी जोरदार निदर्शने करीत घोषणा दिल्या. यावेळी उपस्थित असलेल्या दोन लहान मुलींच्या हस्ते फडणवीस यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला अग्नी देत दहन करण्यात आले.