शिर्डी : शिर्डी येथील साई मंदिरात फुल, हार, प्रसाद नेण्यास बंदी घालण्यात आली होती. आता ही बंदी उठवण्यात आली आहे. यामुळे भाविकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. मंदिरात हार, फुल नेताना बिलाची पावती दाखवावी लागणार आहे.
भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीतील साई मंदिरात भाविकांना फुल, हार, प्रसाद नेण्यास बंदी करण्यात आली होती. भारत- पाकिस्तान दरम्यान परिस्थिती सामान्य झाल्यामुळे ही बंदी उठवण्यात आली आहे. साई मंदिरातील फुल, हार, प्रसाद बंदी उठवल्यामुळे साई भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भाविकांना आता पूर्वी प्रमाणे मंदिरात फुल, हार, प्रसाद नेता येत आहे. परंतु फुल, हार, प्रसाद नेताना प्रवेशद्वारावर बिलाची पावती दाखवणे बंधनकारक असणार आहे.
बिलाची पावती नसणा-यांसाठी बंदी कायम असणार आहे. साई संस्थान क्रेडिट सोसायटीमार्फत फुल, हार, प्रसाद विक्री सुरू करण्यात आली आहे. भाविकांची फसवणूक टाळण्यासाठी खासगी फुल, प्रसाद विक्रेत्यांसाठी नवीन नियमावली तयार करण्यात येणार आहे.
साई भक्तांना पूजेचे सामान मंदिरात नेता येणार आहे. परंतु त्यासाठीही पावती आवश्यक असणार आहे. खासगी दुकानदारांचे दर निश्चित नसल्यामुळे त्यांच्याकडून पावती मिळत नाही. यामुळे भाविकांना संस्थेच्या क्रेडिट सोसायटीमधूनच पावती घ्यावी लागणार आहे. शिर्डीतील साई मंदिरात देशभरातून भाविक येत असतात. तिरुपती बालाजीनंतर हे दुस-या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत देवस्थान आहे. या मंदिरात नेहमी व्हिव्हिआयपी व्यक्तीसुद्धा साईबाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येत असतात.