नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मोबाईलवर येणारे स्पॅम कॉल आणि फसव्या कॉल्सचा त्रास कमी करण्यासाठी आता भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) कठोर पाऊल उचलण्याचे ठरविले असून, देशभरातील मोबाईल वापरकर्त्यांना त्रास देणा-या फसव्या कॉल्सना लगाम लावण्यासाठी नवीन नियमावली लागू केली आहे. त्यामुळे आता फसवे आणि स्पॅम कॉल्सना आळा घालण्यास मदत होणार आहे. त्यामुळे मोबाईलधारकांचा मानसिक त्रास आपोआप कमी होऊ शकणार आहे. १ सप्टेंबरपासून ही नियमावली लागू होणार आहे.
दूरसंचार क्षेत्रातील फसवणूक रोखण्यासाठी सरकार सतत प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून ट्राय देशभरात होणा-या फसव्या कॉल्स आणि स्पॅम कॉलना रोखण्यासाठी नवीन नियम लागू करण्यात येणार आहेत. १ सप्टेंबर २०२४ पासून ही नियमावली लागू होणार आहे. त्यानंतर फसवे कॉल्स आपोआप थांबण्यास मदत होणार आहे. यापूर्वी एआयचा वापर करून ट्रायने असे कॉल्स रोखण्याचा प्रयत्न केला होता. याला ब-यापैकी यशही आले होते. परंतु आता ट्रायने त्यापुढे आणखी एक पाऊल टाकत कडक नियम लागू करणार आहे. जेणेकरून याला आळा बसण्यास मदत होणार आहे.
नवीन नियमावलीनुसार तुमच्या नेटवर्कवरून फसवे कॉल झाले तर त्याची जबाबदारी संबंधित दूरसंचार कंपन्यांची असेल. एखाद्या ग्राहकाने फसव्या कॉलची तक्रार केल्यास त्यावर कारवाई करण्याची जबाबदारी संबंधित दूरसंचार कंपनीची असेल. यामुळे फसव्या कॉलची संख्या लक्षणीयरित्या कमी होण्यास मदत होणार आहे. फसव्या आणि प्रमोशनल कॉलसाठी फसव्या पद्धतीचा वापर हा दूरसंचार नियमांचा स्पष्ट भंग आहे, असे ट्रायने स्पष्ट केले आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ट्रायने एक मजबूत कारवाईचा आराखडा तयार केला आहे. त्यामुळे आता फसवे कॉल बंद होण्यास मदत मिळणार आहे.
…तर नंबर ब्लॅकलिस्टेड
मोबाईल नंबरचा वापर करून टेलिमार्केटिंग किंवा प्रमोशनल कॉल केल्यास तो नंबर दोन वर्षांसाठी ब्लॅकलिस्टेड होईल, असे ट्रायने स्पष्ट केले आहे. आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी आधीच १६० हा विशेष नंबर सिरीज सुरू केली होती. मात्र, अनेक वापरकर्त्यांना अजूनही खाजगी नंबरवरून प्रमोशनल कॉल येत आहेत.
कठोर कारवाईचे संकेत
फसव्या आणि स्पॅम कॉलमध्ये गुंतलेल्या कोणत्याही व्यक्तीविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे ट्रायने स्पष्ट केले आहे. स्पॅम किंवा फसव्या कॉलचे कोणतेही प्रकार आता सहन केले जाणार नाहीत. त्यामुळे तुमच्या नंबरचा वापर प्रमोशनल कॉलसाठी करीत असेल तर सावध राहा, कारण नवा नियम कडकपणे लागू केला जाणार आहे, असेही ट्रायने स्पष्ट केले आहे.